शिक्षण मंडळाच्या शाळांसाठी कुंडय़ा खरेदी करताना झालेल्या गैरव्यवहार प्रकरणी राजीनामा देण्याचा आदेश पक्षाने दिल्यानंतर मंडळाचे अध्यक्ष रवी चौधरी यांनी त्यांच्या पदाचा राजीनामा गुरुवारी महापौर चंचला कोद्रे यांच्याकडे सादर केला. राष्ट्रवादीचे काँग्रेसचे लक्ष्मीकांत खाबिया आणि वासंती काकडे यांची नावे आता अध्यक्षपदासाठी चर्चेत आहेत.
महापालिका शिक्षण मंडळाने राबवलेल्या कुंडय़ा खरेदीच्या प्रक्रियेत गैरव्यवहार झाल्याचा चौकशी अहवाल आल्यानंतर अध्यक्ष रवी चौधरी यांनी राजीनामा द्यावा, असा आदेश बुधवारी राष्ट्रवादी काँग्रेसच्या बैठकीत चौधरी यांना देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसने बोलावलेल्या बैठकीत चौधरी यांनी, कुंडय़ांच्या खरेदीत कोणताही गैरप्रकार झालेला नाही. त्यात माझी कोणतीही चूक नाही, असा दावा केला होता. मात्र, हा गैरव्यवहार त्यांच्या कार्यकाळात झालेला असल्यामुळे त्यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा द्यावा, असा आदेश त्यांना पक्षाने दिला होता. त्यानुसार चौधरी यांनी त्यांचा राजीनामा गुरुवारी सादर केला. राष्ट्रवादीचे लक्ष्मीकांत खाबिया आणि वासंती काकडे यांची नावे आता चर्चेत आली असून पक्ष काय भूमिका घेणार याचीही चर्चा सुरू झाली आहे.