दृश्य स्वरूपात मला ‘राग’ दिसतो. हा राग माझ्या चित्राचा विषय होतो. दृश्य स्वरूपात राग दिसण्याची मानसिक प्रक्रिया सदैव सुरू असते. हा राग एकदा सापडला की मी त्याची कॅनव्हासवर मोठय़ा चित्रामध्ये ‘बंदिश’ करतो.. अशा शब्दांत ज्येष्ठ चित्रकार रवी परांजपे यांनी आपला कलाप्रवास उलगडला. कॅनव्हासच्या चौकटीमध्येच स्वर आणि रंगसामंजस्याच्या मेळाच्या शक्यता शोधणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य. मात्र, हे समजून न घेता पाश्चात्त्यांकडून आयात केलेली विचारसरणी अर्धवटपणे स्वीकारली. त्याचे चुकीचे प्रतििबब आपल्या सार्वजनिक जीवनातही पाहावयास मिळते, असेही त्यांनी सांगितले.
रंग-रेषांची शिखरे गाठत आपला कलाप्रवास ‘ब्रश मायलेज’ या आत्मकथनातून मांडणारे रवी परांजपे बुधवारी (८ ऑक्टोबर) ८० व्या वर्षांत पदार्पण करीत आहेत. आता ‘ब्रेक थ्रू’ची किमया या पुस्तकाद्वारे ते भारतातील प्रतीकांचा वेध घेत आहेत. घट, शिव, पार्वती, गणेश, नटराज, अर्धनारीनटेश्वर, ब्रह्मा, विष्णू ही प्रतीकं पुराणकथांनी देवमूर्ती ठरविल्या. पण, प्रत्यक्षामध्ये ही आपल्या सांस्कृतिक समृद्धीची आणि राष्ट्रजीवनाला मार्गदर्शन करू शकतील अशी सर्जनशीलतेची प्रतीकं होती, ही या लेखनामागची भूमिका असल्याचे परांजपे यांनी सांगितले.
काष्ठमुद्राचित्र या कलेशी माझी चित्रशैली पूरक आहे. मात्र, कार्यबाहुल्यामुळे यामध्ये काही नवीन करायचे राहून गेले. त्याचबरोबर चित्रकलेचे राष्ट्रीय प्रयोजन याबाबतचे विचार खूप उशिराने सुचले. या प्रयोजनाविषयी थोडय़ा फार प्रमाणात सांगू शकलो, लिहू शकलो याचे समाधान आहे. जीवनामध्ये भौतिकदृष्टय़ा मी समृद्ध आहे. पण, कलात्मकदृष्टय़ा नावीन्याचा शोध अजूनही सुरूच असल्याने मी अतृप्त असल्याची भावना परांजपे यांनी व्यक्त केली. सध्याच्या चित्रकारांमध्ये नक्कल म्हणता येणार नाही. पण, अनुकरण करण्याची प्रवृत्ती वाढत आहे. कलावंतांनी सकारात्मक सर्जनशील चिंतन करायला हवे. त्यातून सुचलेले प्रयोग केले पाहिजेत. तरच करिअरला ब्रेक थ्रू मिळेल. अशी इच्छा बाळगणारे कलाकार आहेत. पण, त्यासाठी प्रयोग करण्याचे धाडस लागते. कलात्मक चिंतन ही निरंतर प्रक्रिया असते. असा ‘क्रिएटिव्ह अनरेस्ट’ कलाकारापाशी हवा, अशी अपेक्षा परांजपे यांनी व्यक्त केली.