हर्षा भोगलेचे समालोचन पहिल्यांदा १९९०-९१च्या सुमारास ऑस्ट्रेलिया रेडिओवर ऐकल्याचे चांगले आठवते. त्यावेळेस अनंत सेटलवाड यांच्यासारख्या आवाजाचा टोन असणारा हा समालोचक कोण असा प्रश्न पडला होता. कधीही कोणत्याही प्रकारे ऐकिवात नसलेला हा अगदी तरुण भारतीय समालोचक नॉर्मन ओनील, जिम मॅक्सवेल वगैरे दिग्गजांच्या मांडीला मांडी लाऊन कॉमेंट्री बॉक्समध्ये बसतो आणि अधिकारवाणीने क्रिकेटवर बोलतो याचे आश्चर्य वाटले होते. नंतर यथावकाश त्याच्याबद्दल बरीच माहिती मिळाली आणि पाहता पाहता तो भारतीय क्रिकेटचाच आवाज कसा झाला हे अनुभवायला मिळाले.
कधी नदीसारखे निरंतर पण संयतपणे वहाणारे वक्तृत्त्व तर कधी गिरसप्प्याप्रमाणे धो धो कोसळणारे नाटयमय वक्तृत्त्व, सशक्त शब्दसौष्ठव, श्रीमंत संदर्भ संपन्नता, हेवा वाटावा असा उत्स्फुर्ततेतील गुणात्मक हजरजबाबीपणा या घरंदाज शैक्षणिक पार्श्वभूमीवर बेतलेल्या समालोचनातील गुण वैशिष्टयांमुळे तो छान लोकप्रिय झाला.
त्याने समालोचनाला सुरुवात केली तेव्हा भारतात कॉमेंट्री बॉक्समध्ये माजी खेळाडू हवेत, असा श्रोत्यांचा कल वाढत होता. भारतात समालोचनाची धुरा अनेक वर्षे अनंत सेटलवाड, सुरेश सरय्या, सुशील दोशी, रवि चतुर्वेदी, मुरली मनोहर मंजुल, देवराज व नरोत्तम पुरी वगैरे उच्च पातळीचे क्रिकेट न खेळलेल्या पण समालोचनाची जाण असणाऱ्या लोकांनी सांभाळली होती. चॅनेल नाईंनच्या माध्यमातून भारतीय श्रोत्यांना जसे जसे माजी खेळाडूंकडून (रिची बेनो, मॅक्स वॉकर, इयन चॅपल,फ्रॅंक टायसन) विश्लेषण ऐकायला मिळू लागले तेव्हा श्रोत्यांना थेट तुकाराम महाराजांकडून गाथा ऐकल्याचा आनंद मिळू लागला. त्यामुळे लोकांच्या मागणी प्रमाणे भारतीय टीव्हीवर गावसकर, शास्त्री वगैरे दिग्गज खेळाडू समालोचनाचा अविभाज्य भाग झाले. या रेटयामध्ये जुने समालोचक जे पॅवेलियनमध्ये गेले ते कायमचेच. अशा वातावरणात जे जुने समालोचक देऊ शकत नव्हते आणि जे माजी खेळाडू असणाऱ्या आणि समालोचक झालेल्यांच्या आवाक्याबाहेरचे होते असे एक भन्नाट पॅकेज घेऊन हर्षा आला आणि त्याने बघता बघता आपले वेगळे स्थान निर्माण केले. पण हा प्रवास अत्यंत खडतर होता. कारण कॉमेंट्री बॉक्समध्ये माजी खेळाडूंकडून त्याला पदोपदी ‘तू किती क्रिकेट खेळला आहेस?’ हा प्रश्न थेट किंवा आड़ून आडून विचारला जायचा आणि त्याची उपटसंभू म्हणून अवहेलना केली जायची. साधे कॉलेज क्रिकेट खेळलेल्या मुलाला किती इगो असतो हे ज्यांना माहीत आहे त्यांना शंभर शंभर कसोटी सामने खेळलेल्या खेळाडूंबरोबर बसून समालोचन करणे या करता दया, क्षमा, शांती यांची वस्ती असणे किती आवश्यक असते याची कल्पना येईल. साहजिकच हर्षाची निम्मी शक्ती या दिग्गजांचे इगो सांभाळण्यात जाते हे अजूनही दिसते.
क्रिकेट समालोचनाची पात्रता नेमकी कोणती?
माजी खेळाडूंना वाटते की आम्ही क्रिकेटमधील सर्व बारकावे जाणतो, आम्ही क्रिकेटमधील प्रत्येक तांत्रिक, मानसिक आव्हानाचा सामना केलेला आहे, प्रत्येक परिस्थिती हाताळलेली आहे त्यामुळे क्रिकेटवरील भाष्याची, समीक्षेची, विश्लेषणाची त्यांच्या इतकी पात्रता कोणाची नाही. या मुद्द्यात तथ्य आहे. आपण हर्षाला विचारले की त्याच्या आयआयएम अहमदाबादच्या संस्थेचे कुलगुरु व्यवस्थापन शास्त्रातले तज्ज्ञ असावेत का, व्यवस्थापनातील पदवी नसलेले पण फक्त औद्योगिक जगाचा अनुभव असलेले असावेत तर तो देखील सांगेल की ते व्यवस्थापन शास्त्रातले तज्ज्ञ असावेत. त्यामुळे माजी खेळाडूंना जे वाटते ते अगदीच चूक नाही. पण याला दुसरी बाजू आहे जी तितकीच महत्वाची आहे. क्रिकेट जितका खेळ आहे तितकीच कला आहे. त्यातल्या कलात्मक कवर ड्राइवमुळे, स्ट्रेट ड्राइवमुळे, लेग स्टंपवर पडून ऑफस्टम्प उडवणारया शेन वॉर्नच्या अद्वितीय लेग स्पिनमुळे ज्या भावना उचंबळून येतात त्या भावना नेमक्या शब्दांत पोहोचवणारा भाषाप्रभू कॉमेंट्री बॉक्समधे हवा. विजयाचा अवर्णनीय क्षण, नैराश्येची भावना, अलौकिक पराक्रमाचा क्षण चपखल शब्दांच्या चिमटीत पकड़ण्याकरता लागतो तो भाषाप्रभूच. मैदानावरील गवताच्या हिरवाईचे, स्टेडियम बाहेर डोकावणाऱ्या उंच डोंगर रांगांचे, गॉलसारख्या स्टेडियम बाहेरील समुद्राच्या अथांगतेचे, कधी कोवळ्या किरणात तर कधी भाजून काढणाऱ्या उष्णतेचे मनोहारी निसर्ग वर्णन करण्याकरता भाषाप्रभूच हवा. प्रेक्षकातल्या रंगबिरंगी वेषभूशांचे, सहलीसारख्या आलेल्या बच्चे कंपनीचे, चित्तवेधक ललनांचे वर्णन करायला भाषाप्रभूच हवा. म्हणूनच कार्डस्, ब्रायन जॉन्सटन, जॉन अरलॉट, हेनरी ब्लोफेल्ड, पीटर रोबॉक या क्रिकेट भाषाप्रभू आणि समालोचकांवर लोकांनी जीव ओवाळून टाकला. त्यांनी रेडिओवरील समालोचनातूनसुद्धा दार्शनिक आनंद दिला. कायम बॅटच्या मध्य भागाने मारणाऱ्या ‘जॅक् हॉब्सच्या बॅटची चेंडूने कड घेणे म्हणजे वैश्विक सुव्यवस्थेतील एक छोटा शांतताभांगच’ हे कार्डसने केलेले हॉब्जच्या महतीचे वर्णन किंवा प्रेक्षकातील ललनेच्या कर्णफुलांना’ अशी इअर रिंग मला वेडिंग रिंग म्हणून सुद्धा खूप आवडेल’ ही हेन्री ब्लोफेल्डनी दिलेली दाद किंवा मुरली गोलंदाजी करत असता तर सुनामी आलेला समुद्र गॉलच्या स्टेडियम बाहेरच थांबला असता ही टोनी ग्रेगने दिलेली दाद याला भाषाप्रभूच हवा. या तोडीच्या अनेक कल्पना आणि वाक्ये सुचणे आणि त्यांची क्रिकेट मधील सार्वकालिन वचने होणे भारतीय माजी खेळाडूंना जमले आहे का, ह्याचे उत्तर ज्याचे त्याने शोधावे. तांत्रिक बाबींची उकल करताना श्रेष्ठ वाटणारे हे माजी भारतीय खेळाडू सामना संपल्यानंतर खेळाडूंच्या मुलाखती घेताना हर्षा इतके अभिजात वाटतात का हे ही प्रत्येकाने शोधावे. ऑस्ट्रेलिया, इंग्लंड यांचे माजी खेळाडू जे समालोचक आहेत ते खिळवून ठेवतात. ‘इंग्लंडचा गोलंदाज फिल टफ़नेल गोलंदाजी करताना इंग्लंडला एक मोठा फायदा असतो की तो त्या वेळेस क्षेत्ररक्षण करत नसतो’ असे इयन चॅपलसारखे श्रेष्ठ ह्यूमर आपल्या माजी खेळाडूंकडून ऐकायला मिळते का? (फिल टफनेलचे क्षेत्ररक्षण कच्चे होते) म्हणून रूडी कुर्टज़न सारखा निर्विकार पंच कधीतरी हसतो तेव्हा ‘रूडी कुर्टज़न ह्या आधी जेव्हा हसले होते तेव्हा पश्चिम आशियात शांतता प्रस्थापित झाली होती’ हे म्हणणारा हर्षा कॉमेंट्री बॉक्स मध्ये हवाच असं वाटत
बांगलादेशच्या सामन्यात नेमके काय झाले?
बांगलादेशविरुद्ध भारत या टी-२० वर्ल्डकप सामन्यात हर्षाने बांगलादेशची वारेमाप स्तुती केली, असे अमिताभ बच्चन ट्विटरवर म्हणाले आणि धोनीने त्यास अनुमोदन दिले. या सामन्याचे प्रक्षेपण बांगलादेशात जात असल्याने निर्मात्यांच्या सूचनांप्रमाणे फक्त हर्षाच नाही तर मांजरेकर, गावसकर हे सर्वच बांगलादेशी खेळाडूंनी एक चेंडू निर्धाव टाकला तरी त्याला शब्दकोष संपेपर्यंत विशेषणे लावत होते. हे समालोचन कुणालाही खटकण्यासारखे होते कारण त्यात प्रामाणिकपणा नव्हता. व्यावसायिक लांगुलचालन होते. पण यात सर्व समालोचक सारख्याच मात्रेत पानाला गुलकंद लावत होते. एकटा हर्षा नव्हे. (आता बीसीसीआयची खप्पा मर्जी झाल्यावर हर्षाला बांगलादेशचा क्रिकेट दूत म्हणून अपॉइंटमेंट मिळू शकते ही गोष्टं वेगळी) त्यामुळे क्रिकेट पाहाताना आता समालोचक श्रोत्यांना क्रिकेट साक्षर बनवतात यावरील विश्वास उडत चालला आहे. बांगलादेश सामन्यामुळेच हर्षाची गच्छंती झाली असेल, का पदाधिकाऱ्यांशी झालेल्या बाचाबाची मुळे झाली असेल याचा आपण फक्त तर्क लाऊ शकतो.
पण कॉमेंट्री बॉक्समध्ये क्रिकेटगुरुबरोबर भाषाप्रभू असला तरच खेळाचा परिपूर्ण दृक्-श्राव्य अनुभव मिळाला आणि आपण तृप्त झालो, असे म्हणता येईल.
– रवि पत्की
sachoten@hotmail.com