News Flash

सामाजिक कार्यासाठी ‘मेळघाटावरील मोहर’ पुस्तक विक्रीतून तीन लाख ६० हजारांचा निधी

या पुस्तक विक्रीतून उभा राहिलेला तीन लाख ६० हजार रुपयांचा निधी गुरुवारी (२६ फेब्रुवारी) कोल्हे दांपत्यास कृतज्ञतापूर्वक सुपूर्द केला जाणार आहे.

| February 25, 2015 03:10 am

सामाजिक कार्यासाठी  ‘मेळघाटावरील मोहर’ पुस्तक विक्रीतून तीन लाख ६० हजारांचा निधी

मेळघाटामध्ये सामाजिक काम करणाऱ्या डॉ. रवींद्र कोल्हे आणि डॉ. स्मिता कोल्हे या दांपत्याची कहाणी शब्दबद्ध झालेल्या ‘मेळघाटावरील मोहर’ या पुस्तकावर वाचकांनी मोहोर उमटवली आहे. या पुस्तक विक्रीतून उभा राहिलेला तीन लाख ६० हजार रुपयांचा निधी गुरुवारी (२६ फेब्रुवारी)  कोल्हे दांपत्यास कृतज्ञतापूर्वक सुपूर्द केला जाणार आहे.
बैरागडच्या सर्वागीण विकासाच्या दृष्टीने कोल्हे दांपत्यानी हाती घेतलेले काम पूर्णत्वास कसे नेले आणि आलेल्या अडचणींवर त्यांनी कशी मात केली हे ‘मेळघाटावरील मोहर’ या पुस्तकाद्वारे वाचकांच्या भेटीस आले आहे. लेखिका मृणालिनी चितळे यांनी शब्दबद्ध केलेले हे पुस्तक राजहंस प्रकाशनने प्रकाशित केले आहे. कोल्हे दांपत्याच्या कार्याचा अधिक परिचय व्हावा म्हणून ‘देणे समाजाचे’ या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे आयोजन ‘अक्षरधारा’ने केले आहे.
१ ऑक्टोबर ते ३१ डिसेंबर या कालावधीत या पुस्तकाच्या जितक्या प्रती विकल्या जातील त्या प्रत्येक प्रतीमागे ५० रुपये कोल्हे दांपत्याच्या समाजकार्यासाठी द्यायचा निर्णय राजहंस प्रकाशनने घेतला होता. विशेष म्हणजे या तीन महिन्यांच्या कालावधीत या पुस्तकाच्या तब्ब्ल ४ हजार २०० प्रती विकल्या गेल्या. प्रकाशनने आधी जाहीर केल्याप्रमाणे या पुस्तकाच्या प्रतींचे दोन लाख १० हजार रुपये वेगळे काढले. त्यामध्ये राजहंस प्रकाशनने एक लाख रुपयांची तर, लेखिका मृणालिनी चितळे यांनी ५० हजार रुपयांची भर घातली. त्यामुळे संकलित झालेला तीन लाख ६० हजार रुपयांचा निधी कोल्हे दांपत्यास त्यांच्या सामाजिक कामासाठी सुपूर्द करण्यात येणार आहे. निवारा सभागृह येथे गुरुवारी (२६ फेब्रुवारी) सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमास सामाजिक कार्यकर्त्यां रेणू गावस्कर, राजहंस प्रकाशनचे दिलीप माजगावकर आणि डॉ. सदानंद बोरसे उपस्थित राहणार आहेत.
‘मेळघाटावरील मोहर’ पुस्तकाला वाचकांनी भरभरून प्रतिसाद दिला. अक्षरधाराच्या माध्यमातून या पुस्तकाच्या दीड हजारांहून अधिक प्रतींची विक्री झाली असून सामाजिक प्रकल्पासाठी मोठा निधी उभा होऊ शकला, असे रसिका राठिवडेकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2015 3:10 am

Web Title: ravindra kolhe smita kolhe book readers
टॅग : Readers
Next Stories
1 इतर राज्यांमधूनही नामदेव भक्त करणार घुमानवारी
2 गुणवत्तेत खासगी आणि सरकारी शाळा एकाच पायरीवर!
3 कुणाचीही ‘कॉपी’ नको; लोकांना तुमच्या मागे येऊ द्या! – शत्रुघ्न सिन्हा
Just Now!
X