मुंबईसारख्या शहरांवर जर पुन्हा हल्ल्याचा प्रयत्न झाला, तर बालाकोट, उरीप्रमाणेच चोख प्रत्युत्तर दिले जाईल आणि हल्लेखोरांचेच मोठे नुकसान होईल, याची त्यांनाही जाणीव आहे, असे प्रतिपादन केंद्रीय विधि व न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी शनिवारी केले. जागतिक मंदीच्या वातावरणातही देशाची अर्थव्यवस्था उत्तम असून सहा टक्क्यांपेक्षा अधिक विकासदर आहे, असे प्रसाद यांनी स्पष्ट केले.
मुंबईवर २००८ मध्ये अतिरेकी हल्ला झाला व सरकार हतबल होते. तत्कालीन गृहमंत्र्यांनी केवळ माफी मागितली. पण भाजप सरकारच्या कारकीर्दीत अतिरेकी हल्ल्यांनंतर चोख प्रत्युत्तर दिले गेले आहे. आता पुन्हा कोणीही िहमत करणार नाही, असे प्रसाद यांनी सांगितले. देशाची आर्थिक स्थिती मजबूत असून परकीय गुंतवणुकीत २० टक्क्यांनी वाढ झाली आहे, चलनवाढीचा दर घसरला आहे, गेल्या पाच वर्षांमध्ये प्राप्तिकरदाते व प्राप्तिकराचा महसूल मोठय़ा प्रमाणावर वाढला आहे, परकीय चलनाची गंगाजळी वाढली आहे, असे अनेक आकडेवारी व अहवालांचा उल्लेख करून प्रसाद यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार पारदर्शी पद्धतीने काम करीत असून कायदा-सुव्यवस्था उत्तम आहे, अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे, एकही जातीय दंगल झालेली नाही, असे प्रसाद यांनी नमूद केले.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on October 13, 2019 3:58 pm