कोशनिर्मितीच्या माध्यमातून मराठी ज्ञानाच्या प्रांतामध्ये आपल्या कार्याचा ठसा उमटविलेले ‘ज्ञानकोश’कार डॉ. श्रीधर व्यंकटेश केतकर यांच्या सात कादंबऱ्या वाचकांच्या भेटीला येत आहेत. नऊ दशकांपूर्वी बंडखोर विचार मांडणाऱ्या केतकर यांच्या दुर्मिळ साहित्याचे पद्मगंधा प्रकाशनने पुनर्प्रकाशन केले आहे.
कॉपीराईट कायद्यातील तरतुदींनुसार एखाद्या लेखकाच्या निधनानंतर ६० वर्षांनी त्यांच्या साहित्याच्या प्रकाशनाचे हक्क खुले होतात. त्याचाच आधार घेत पद्मगंधा प्रकाशनने ज्ञानकोशकारांच्या या कादंबऱ्यांचे प्रकाशन करून केतकर यांच्या व्यक्तिमत्त्वातील कादंबरीकार या पैलूवर नव्याने प्रकाशझोत टाकला आहे. ‘गोंडवनातील प्रियंवदा’ आणि ‘परागंदा’ (१९२६), ‘ब्राह्मणकन्या’ (१९३०), ‘विचक्षणा’ आणि ‘आशावादी’ (१९३७), ‘भटक्या’ (१९३८), ‘गावसासू’ (१९४२) या सात कादंबऱ्यांसह ‘महाराष्ट्रीयांचे काव्यपरीक्षण’ हे १९२८ मधील पुस्तक वाचकांसाठी पुन्हा प्रकाशित केले असल्याची माहिती अरुण जाखडे यांनी दिली.
जाखडे म्हणाले, ज्ञानकोशकार केतकर यांच्यावर परदेशी ज्ञानाचा प्रभाव होता. त्यांची दृष्टी आधुनिक होती. ९० वर्षांपूर्वी केतकर यांनी या कादंबरीलेखनाच्या माध्यमातून वेश्या संतती, विवाहबाह्य़ संबंध, अमेरिकेतील स्थलांतर असे काळाच्या पुढचे विषय मांडले आहेत. त्यावेळी बंडखोर असलेले हे विचार आता समकालीन असेच आहेत. त्यामुळे या कादंबऱ्या आजचेच वास्तव मांडणाऱ्या ठरतात. ज्ञानकोशकार केतकर यांची कादंबरीकार ही अस्पष्ट झालेली ओळख ठळक व्हावी हाच यामागचा उद्देश आहे, असे ते म्हणाले.
First Published on July 17, 2013 2:50 am
No Comments.