माझेही रांगेतूनच मतदान15dhankavde
धनकवडी गावातील समर्थ बालक मंदिर येथे माझे मतदान केंद्र होते. गेली अनेक वर्षे मी धनकवडीत मतदान करत आहे.  इतर मतदारांप्रमाणेच मी देखील रांगेत उभा राहिलो होतो. माझ्याकडेही ओळखीचा पुरावा मागण्यात आला. मी माझा वाहन चालवण्याचा परवाना नेला होता. तो तेथे दाखवला. मतदान केंद्रातील व्यवस्था चांगली होती आणि येणाऱ्या सर्व मतदारांना तेथील कर्मचारी चांगली वागणूक देत होते. त्या केंद्रावर सकाळी गर्दी कमी होती; पण नऊ नंतर मात्र रांगा लागल्या.
दत्ता धनकवडे, महापौर, पुणे
 

अजेंडा पटला किंना न पटला तरी..15choudhari
‘‘कोणता अजेंडा पटला किंवा मुद्दा पटला यापेक्षाही कर्तव्य म्हणून मतदान केले. मी प्रत्येक निवडणुकीला मतदान करतोच. गेल्या पंचवीस वर्षांत झालेल्या सगळ्या निवडणुकांना मी मतदान केले आहे. कोणतेही काम आले तरी मतदान करण्याला माझे प्राधान्य असते. यावेळी मतदानाचा उत्साह लोकसभेपेक्षा खूपच कमी दिसला.’’
– प्रमोद चौधरी, अध्यक्ष, प्राज इंडस्ट्रिज

 
घटनेने दिलेला मोठा अधिकार15babaadhav
भारताच्या राज्यघटनेने मतदान हा लोकशाहीतील सर्वात मोठा अधिकार सामान्य माणसाला दिला आहे. त्यामुळे संविधानाला प्रणाम केलाच पाहिजे या कर्तव्यभावनेतून मी मतदान करतो. मूल्यांच्या जडणघडणीमध्ये सामाजिक बांधीलकी ठेवणारी व्यक्ती ही बाब माझ्यासाठी उमेदवार आणि त्याच्या पक्षापेक्षा मोठी वाटते. १९५२ नंतरच्या प्रत्येक लोकसभा, विधानसभा आणि महापालिका निवडणुकीत मी मतदान केले आहे. १९५२ मध्ये मी २२ वर्षांचा होतो. पण, मतदारयादीमध्ये नाव नसल्यामुळे मला त्या वेळी मतदान करता आले नाही. दोन वेळा लोकसभा निवडणूक लढविली असून काही वेळा निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागही घेतला आहे. पर्वती विधानसभा मतदारसंघातील बिबवेवाडी येथील बाबू गेनू विद्यालयामध्ये पत्नीसमवेत जाऊन मी मतदान केले. सकाळी मतदान केंद्रावर गर्दी असल्याने अर्धा तास थांबावे लागले.
– डॉ. बाबा आढाव, सामाजिक कार्यकर्ते

मतदान हा जन्मसिद्ध हक्क
‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’, असे लोकमान्यांनी इंग्रजांना ठणकावून सांगितले होते. त्या धर्तीवर ‘मतदान हा सुजाण झाल्यावर माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी करणारच’ असे म्हणावेसे वाटते. लोकशाहीमध्ये मतदार हा राजा असतो हे जाणून घेण्यासाठी मतदान केलेच पाहिजे. माझ्या एका मताने मी एखाद्याला खुर्चीवर बसवू शकतो, तसा त्याला खुर्चीवरून खाली खेचू शकतो. कसबा विधानसभा मतदारसंघातील नूतन समर्थ मंदिर येथे पत्नी, बाबा आणि भावासमवेत जाऊन मी मतदान केले.
– सुबोध भावे, अभिनेता

बोलण्या-वागण्यामध्ये तफावत15mrunmayee
घटनेने दिलेला अधिकार असल्याने मतदान हे केलेच पाहिजे, या भावनेतून मी बहिणीसमवेत पर्वती येथील शाळेमध्ये जाऊन मतदान केले. मतदान करणे ही आपली राष्ट्राबद्दलची आणि महाराष्ट्राबद्दलची जबाबदारी आहे. ती पार पाडलीच पाहिजे. पण, मतदान केंद्रावर फारशी गर्दी नव्हती. त्यामुळे आपण लोकशाहीबद्दलच्या गप्पा करतो, पण प्रत्यक्ष मतदानाला जात नाही हे ध्यानात आले. आपल्या बोलण्यात आणि वागण्यामध्ये तफावत आहे याची प्रचिती आली.
– मृण्मयी देशपांडे, अभिनेत्री

आमचे मतदान सहकुटुंब15chordia
आम्ही सर्व जण सहकुटुंब मतदानाला जातो. गेल्या अनेक वर्षांची ही परंपरा आहे. माझे चौऱ्याऐंशी वर्षांचे वडील हुकुमचंदजी मी आणि माझा मुलगा अशा तीन पिढय़ांनी बिबवेवाडीतील इएसआय रुग्णालय येथील मतदान केंद्रात सकाळी मतदान केले. तेथे चांगला उत्साह जाणवला. आम्ही सहा जण मतदानाला गेलो होतो. बरोबर तीन भाऊ आणि नातेवाईकही होते. मतदान आम्ही कधीही चुकवत नाही. लोकशाही टिकवायची असेल तर मतदान करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य ठरते.
राजकुमार चोरडिया, संचालक, प्रवीण मसालेवाले

राष्ट्रीय कर्तव्य म्हणून.
राष्ट्रीय कर्तव्य म्हणून मतदान केले. नागरिक म्हणून ते आपले काम आहे, लोकशाहीत ते प्राधान्याने करायला पाहिजे. लोकांमध्ये उत्साह जाणवला. लोकांचे प्रमाण वाढल्याचे जाणवले. मी बिबवेवाडी येथे मतदान केले. तेथे तरुण-तरुणींचे प्रमाण जास्त होते.
– अॅड. प्रताप परदेशी, ज्येष्ठ वकील