केंद्र सरकारने मांडलेला अर्थसंकल्प लघुउद्योजकांच्या तोंडाला पाने पुसणारा, अपेक्षाभंग करणारा निष्प्रभ असा आहे, अशी टीका उद्योगनगरीतील लघुउद्योजक संघटनेच्या वतीने सोमवारी पत्रकार परिषदेत करण्यात आली.
आकुर्डीत झालेल्या पत्रकार परिषदेत संघटनेचे अध्यक्ष संदीप बेलसरे, उपाध्यक्ष संजय जगताप यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी अर्थसंकल्पाविषयी आपली मते मांडली. बेलसरे म्हणाले, लघुउद्योजकांसाठी नवीन घोषणा नाही, करप्रणालीत सुधारणा नाही. येत्या काळात लघुउद्योजकांच्या समस्यांवर भर पडणार आहे, असे संकेत अर्थसंकल्पातून मिळत आहेत. सेवा आणि वस्तुकराची अंमलबजावणी व्हायला हवी होती, असे सांगत टाटा मोटर्स, बजाजसारख्या कंपन्यांच्या उत्पादनावर यापूर्वीच परिणाम झाला आहे. भविष्यात आणखी भीषण परिस्थिती निर्माण होईल, अशी भीती त्यांनी व्यक्त केली. जगताप म्हणाले, जुन्या उद्योगांसाठी काहीच नाही. कृषी अधिभार रद्द करायला हवा. डिझेल स्वस्त करून डिझेल वाहने व छोटय़ा कार महागणार, हा विरोधाभास आहे.
नगरसेवक सुरेश म्हेत्रे म्हणाले, िपपरी-चिंचवडच्या औद्योगिक परिसरात मंदीचे वातावरण आहे. १० लाखाच्या पुढील वाहने महाग होणार असल्याने मंदीत भरच पडणार आहे. मंदीतून सावरण्यासाठी लघुउद्योजकांना पॅकेज हवे होते. शेतकऱ्यांच्या आत्महत्या शेतकऱ्यांसाठी भूषणावह नाही. शेतकऱ्यांकडे लक्ष दिले पाहिजे, मात्र आत्महत्या करण्याची वेळ लघुउद्योजकांवर येऊ नये, याचाही विचार व्हायला हवा. नदीजोड सारख्या प्रकल्पांसाठी पाऊल उचलण्याची गरज आहे, असे मत म्हेत्रे यांनी व्यक्त केले. करांच्या बाबतीत स्पष्टता नाही, याकडे जयंत कड यांनी लक्ष वेधले. अपेक्षाभंग झाल्याचे सांगत संजय ववले यांनी ‘अच्छे दिन’ कुठे दिसत नाहीत, अशी उपरोधिक टीका केली. विनोद नाणेकर यांनी, आजारी लघुउद्योजकांसाठी विशेष पॅकेज हवे होते, अशी अपेक्षा व्यक्त केली. प्रवीण लोंढे यांनी यंदाच्या अर्थसंकल्पातून लघुउद्योजकांना काहीच मिळाले नसल्याने घोर निराशा झाली असून, करांमध्ये कोणतीही सवलत मिळाली नाही, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.