26 September 2020

News Flash

पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांचे वाचन आणि आकलन शून्य

६८१ विद्यार्थ्यांना व्यवस्थित वाचता येत नसल्याचे चित्र

|| चिन्मय पाटणकर

‘मंथन संस्थे’ने वर्षभर केलेल्या अभ्यासातील निष्कर्ष; ६८१ विद्यार्थ्यांना व्यवस्थित वाचता येत नसल्याचे चित्र

शिक्षण क्षेत्रात महाराष्ट्र आघाडीवर असल्याचा डंका राज्य सरकार पिटत असताना शिक्षण क्षेत्रातील दयनीय अवस्था समोर आली आहे. मंथन एज्युकेशनल इनिशिएटिव्ह या संस्थेच्या अहवालातून १२८४ विद्यार्थ्यांपैकी एकाही विद्यार्थ्यांला वाचलेल्याचे आकलन होत नाही, तर ६८१ विद्यार्थ्यांना व्यवस्थित वाचता येत नसल्याची धक्कादायक माहिती स्पष्ट झाली आहे. इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांची पुणे शहरातील ही अवस्था असेल तर राज्यातील इतर भागात काय परिस्थिती असेल असा प्रश्न उपस्थित होत आहे.

मंथन एज्युकेशनल इनिशिएटिव्ह या संस्थेने गेले वर्षभर पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांसाठी वाचन आणि आकलनासाठी विशेष प्रकल्प राबवला. त्या प्रकल्पाच्या अहवालाची माहिती संस्थेचे संचालक राहुल कोकिळ यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. या अहवालातून पुण्यातील खासगी मराठी माध्यमाच्या शाळांतील विद्यार्थ्यांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाचनदोष असल्याची माहिती समोर आली आहे. संस्थेने पुणे आणि पिंपरी चिंचवड येथील मिळून सहा शाळांतील पाचवी ते नववीच्या १२८४ विद्यार्थ्यांचा अभ्यास केला. प्रकल्पाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांचे वैयक्तिक पातळीवर सर्वेक्षण करण्यात आले. वर्षांच्या सुरुवातीला पहिल्या पातळीत १९२, दुसऱ्या पातळीत २१७, तिसऱ्या पातळीत २७२, चौथ्या पातळीत १४२ आणि पाचव्या पातळीत ४६१ विद्यार्थी होते.

वर्षभर या शाळांमध्ये प्रत्येकी सुमारे बावीस तास समांतर पद्धतीने अध्यापन झाले. त्या विद्यार्थ्यांना गोष्टी वाचून दाखवणे, श्राव्य पुस्तके ऐकवणे असेही उपक्रम झाले. या विद्यार्थ्यांच्या वाचन आणि आकलनाकडे लक्ष दिल्यावर १२८४ विद्यार्थ्यांपैकी ३८४ विद्यार्थ्यांमध्ये सुधारणा जाणवल्या, तर २१ विद्यार्थी आकलनाच्या पातळीला पोहोचले. जवळपास ७९६ विद्यार्थी वर्षभर या समांतर वर्गाना उपस्थित होते.

‘वर्षभर केलेल्या कामातून समोर आलेली परिस्थिती नक्कीच धक्कादायक आहे. या मागे विविध कारणे आहेत. प्रामुख्याने विचार करायचा झाल्यास, मुलांच्या घरचे आणि आजूबाजूचे वातावरण, पालकांचा निष्काळजी दृष्टिकोन, दृश्यमाध्यमाचा मुलांवर असलेला मोठा परिणाम आणि आठवीपर्यंत विद्यार्थ्यांना उत्तीर्ण करण्याच्या धोरणाचा हा परिणाम आहे. मुलांची भाषा चांगली असणे अत्यावश्यक आहे. कारण, त्याशिवाय मुलांना व्यवस्थित शिकताच येणार नाही. त्यातही मराठी चांगले नसल्यास गणित आणि विज्ञान या विषयांतील मूलभूत संकल्पनाच त्यांना कळणार नाही. वर्षभर केलेला हा अभ्यास अतिशय प्राथमिक पातळीवरचा आहे. या विषयामध्ये सखोल काम करण्याची आवश्यकता आहे. राज्यभरात अशा पद्धतीने अभ्यास केल्यास वस्तुस्थिती समोर येईल,’ असे कोकिळ  यांनी सांगितले.

शिक्षक करतात काय?

पहिली ते चौथी या इयत्तांमध्ये विद्यार्थ्यांच्या वाचनाचा पाया पक्का होतो. मात्र, संस्थेने केलेल्या अभ्यासात पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांमधील वाचन आणि आकलनातील दोष समोर आले आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे वाचन आणि आकलन चांगले होते आहे की नाही या कडे शाळेतील शिक्षक लक्ष देतात देतात की नाही असा प्रश्न उपस्थित होतो.

वाचनाच्या सहा पातळ्या

  • मूळाक्षरे
  • बाराखडी
  • जोडाक्षरे, जोडशब्द
  • वाचनाचा ओघ
  • शब्दसंग्रह
  • आकलन

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2018 2:03 am

Web Title: reading and calculating
Next Stories
1 ‘रिलायन्स’च्या करमाफीला विरोध
2 पिंपरीत काँग्रेसच्या अस्तित्वाचाच प्रश्न
3 पोलीस ठाण्यात महिला पोलीस असुरक्षित!
Just Now!
X