ब्रेल लिपीच्या साह्याने अंध व्यक्तीने प्रादेशिक बातमीपत्राच्या उत्तरार्धाचे वाचन करत पुणे आकाशवाणीने सोमवारी नवा इतिहास घडवला. अशा पद्धतीने प्रादेशिक बातमीपत्राचे ब्रेल लिपीच्या साह्याने अंध व्यक्तीने वाचन करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
ब्रेल लिपीचे शोधकर्ते आणि फ्रेंच शिक्षणतज्ज्ञ लई ब्रेल यांच्या जयंतीचे औचित्य साधून पुणे आकाशवाणीच्या वृत्त विभागाकडून या नव्या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुणे आकाशवाणीवरून सकाळी सात वाजून दहा मिनिटांनी दिल्या जाणाऱ्या प्रादेशिक बातम्या राज्यातील सर्व केंद्रांवरून प्रसारित केल्या जातात. सोमवारी या बातमीपत्राचा उत्तरार्धाचा भाग ब्रेल लिपीमध्ये तयार करण्यात आला होता. ‘पुणे ब्लाईंड मेन्स असोसिएशन’चे धनराज पाटील यांनी ब्रेल लिपीच्या साह्याने बातम्यांचे थेट प्रसारणात वाचन केले. आकाशवाणीच्या मराठी बातमीपत्राच्या इतिहासात पहिल्यांदाच अशी व्यवस्था करण्यात आली होती.