अनेकांकडून खोटी कारणे; काहींना काठीचा प्रसाद

पुणे : करोनाचा संसर्ग वाढीस लागल्याने संचारबंदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. अत्यावश्यक सेवेव्यतिरिक्त नागरिकांनी कामाशिवाय बाहेर पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले असले, तरी अनेक जण संचारबंदीच्या आदेशाचे भंग करत असल्याचे निदर्शनास आले आहे. नाकाबंदीत सापडल्यानंतर पोलिसांना खोटी कारणे दिली जातात.

पोलिसांकडून त्यांना परिस्थितीचे गांभीर्य देखील समजावून सांगितले जात असून विनाकारण बाहेर पडू नका, अशी विनंती केली जात आहे. काही जणांना पोलिसांकडून काठीचा प्रसाद देण्यात येत आहे. संचारबंदीचे आदेश लागू झाल्यानंतर काही जण विनाकारण बाहेर पडत आहेत. हातात पिशवी घेऊन चालायला जाणारे अनेक जण पाहायला मिळतात. काही जण औषध खरेदीसाठी निघालो असल्याची बतावणी पोलिसांकडे करत आहेत. नाकाबंदीत पोलिसांकडून दुचाकीस्वार नागरिक तसेच पादचाऱ्यांची विचारणा केली जात आहे. संचारबंदीच्या आदेशाचा भंग करणाऱ्यांवर कारवाई करण्यापेक्षा त्यांचे प्रबोधन करण्यात येत आहे. उगीच फिरू नका. शहरात करोनाचा संसर्ग वाढत आहे, असे बंदोबस्तावरील पोलिसांकडून सांगण्यात येते.

याबाबत विश्रामबाग पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय टिकोळे म्हणाले, ‘शहराच्या मध्यभागात पोलिसांकडून बंदोबस्त वाढविण्यात आला आहे. गस्त घालण्यात येत आहे. काही जण संचारबंदीचा आदेश भंग करून विनाकारण फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. पोलिसांकडून चौकशी करण्यात येत आहे. पोलिसांना औषध, भाजी खरेदीसाठी निघालो असल्याचे सांगितले जाते. सदाशिव पेठ भागात मोठ्या संख्येने बाहेरगावाहून येणारे विद्यार्थी वास्तव्यास आहेत. त्यांना सहकार्य करण्यात येत आहे. काही विद्यार्थी दिवसभर अभ्यास करून कंटाळतात. फिरायला बाहेर पडणाऱ्या विद्याथ्र्यांना घरात रहा. विनाकारण बाहेर पडू नका, असे सांगितले जात आहे. ’

खोटी कारणे

शहराच्या मध्यभागात नाकाबंदीत पोलिसांनी एकाला पकडले. तेव्हा त्याने मी करोनाबाधित असून रुग्णालयात दाखल होण्यासाठी निघालो असल्याचे कारण पोलिसांना दिले.  हे कारण ऐकून पोलीस चक्रावून  गेले. अंत्यविधीसाठी निघालो आहे, असेही कारण सांगितले जात आहे. काही जण उगीच हातात पिशवी घेऊन फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे.

शहरात करोनाचा संसर्ग वाढत आहे. अनेकांना परिस्थितीचे गांभीर्य माहीत नाही. नाकाबंदीत काही जण खोटी कारणे देतात. घरातून काम करत आहे. पाय मोकळे करायला बाहेर पडलो आहे. आई-वडिल दुसरीकडे राहायला आहेत. त्यांना भेटायला निघालो आहे तसेच वेगवेगळी कारणे सांगून आदेशाचा भंग करत असल्याचे निदर्शनास आले आहे. काही मुले विनाकारण फिरत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर त्यांच्या पालकांना पोलिसांनी परिस्थिती समजावून सांगितली. – नम्रता पाटील, पोलीस उपायुक्त, परिमंडल पाच