महाराष्ट्र व आसपासच्या परिसरात सध्या सुरू असलेल्या भयंकर गारपिटीला हवामानाची विशिष्ट स्थिती कारणीभूत आहे. याबाबत नॅशनल क्लायमेट सेंटरचे संचालक डॉ. ए. के. श्रीवास्तव आणि पुणे वेधशाळेच्या अधिकारी डॉ. सुनीता देवी यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यामागे हवामानाचे जागतिक घटकही कारणीभूत असल्याची शक्यता आहे.
– भारतात हिमालयाच्या परिसरात पश्चिमेकडून येणारे वारे (वेस्टर्न डिस्टर्बन्सेस) वाहत असतात. त्यांच्यासोबत बाष्प आले की तिथे हिमवृष्टी होते. या वाऱ्यांचा प्रभाव मुख्यत: हिमालयाच्या पट्टय़ात किंवा फारतर उत्तर भारतापर्यंत असतो. गेल्या काही दिवसांपासून त्यांचा प्रभाव दक्षिणेपर्यंत पोहोचला आहे. याशिवाय अतिशय उंचीवरून वाहणाऱ्या वाऱ्यांचे प्रवाह अर्थात जेट प्रवाह सध्या अतिउत्तरेत असायला हवेत. तेसुद्धा आता दक्षिणेकडे सरकले आहेत. हे वारे कोरडे असतात.
– त्याच वेळी सध्या महाराष्ट्रात बंगालच्या उपसागराकडून वारे येत आहेत. ते बाष्प घेऊन येत आहेत. हे बाष्प आणणारे वारे जमिनीजवळ आहेत. याचा परिणाम म्हणून सध्या कोरडे वारे हवेच्या वरच्या थरात आहेत, तर बाष्प असलेले वारे खालच्या थरात आहेत. अशी स्थिती अस्थिर हवामानाला जन्म देते.
– असे हवामान सध्या महाराष्ट्रावर व आसपासच्या परिसरात आहे. या स्थितीत बाष्पयुक्त वारे खूप उंचीपर्यंत जातात. ते वर गेले की बाष्प गोठते व त्याचे रूपांतर गारांमध्ये होते. हवामानाची ही स्थिती बरेच दिवस कायम आहे. त्यामुळे महाराष्ट्राला भयंकर गारपीट सहन करावी लागत आहे.