शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या प्रसिद्ध ‘शेलारखिंड’या ऐतिहासिक कादंबरीतील थरार आता अभिवाचनातून उलगडणार आहे. अभिवाचनाच्या या अनोख्या उपक्रमाचा पहिला प्रयोग उद्या रविवारी (दि. १०) सादर होत आहे.
शिवशाहिरांनी लिहिलेली ‘शेलारखिंड’ ही कादंबरी शिवकाळावर आधारित आहे. यामध्ये शिवकाळातील गडकिल्ले, त्यावरच्या लढाया आणि या साऱ्यांत जिद्दीची, पराक्रमाची ती ‘शेलारखिंड’ लढवणारे सर्जा आणि कस्तुरीसारखे स्वराज्यनिष्ठेने भारावलेले मावळे भेटतात. ही कथा जरी काल्पनिक असली तरी शिवशाहिरांच्या लेखणीमुळे त्यामध्ये इतिहासाचे अनेक अस्सल संदर्भ पेरलेले आहेत. त्यावेळेचा तो समाज, स्वराज्यप्रेमाचे ते वारे इथे पानोपानी भेटते. शिवकाळाने भारावलेल्या या साहित्यकृतीला अभिवाचनातून आता जनतेपुढे साकार केले जात आहे. पुण्यातील ‘रंग-तरंग’ संस्थेतर्फे होत असलेल्या या उपक्रमात मिलिंद रथकंठीवार, डॉ. प्रतिमा विश्वास आणि शुभदा कुलकर्णी हे या कादंबरीचे अभिवाचन करणार आहेत. या अभिवाचनाला दृकश्राव्य माध्यमाचीही जोड देण्यात आलेली आहे. या उपक्रमाचा पहिला प्रयोग उद्या रविवारी (दि. १०) होत आहे. पत्रकार संघाच्या सभागृहात सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या या प्रयोगास शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे महानगर संघचालक बापूसाहेब घाटपांडे, महाराष्ट्र बँकेचे विलास रवदे, डॉ. विजय देव, डॉ. वीणा देव आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत. हा कार्यक्रम सर्वासाठी खुला आहे.