News Flash

मराठी साहित्यामध्ये जुने तेच सोने! –

मराठी वाङ्मयामध्ये अजरामर ठरलेल्या ‘मृत्युंजय’, ‘छावा’ आणि ‘युगंधर’ या शिवाजी सावंत यांच्या तीन कादंबऱ्यांची विक्रमी विक्री झाली असून साहित्याच्या प्रांतामध्ये ‘जुने तेच सोने’ याची प्रचिती

| February 5, 2014 03:17 am

मराठी वाङ्मयामध्ये अजरामर ठरलेल्या ‘मृत्युंजय’, ‘छावा’ आणि ‘युगंधर’ या शिवाजी सावंत यांच्या तीन कादंबऱ्यांची विक्रमी विक्री झाली असून साहित्याच्या प्रांतामध्ये ‘जुने तेच सोने’ याची प्रचिती येत आहे. दोन प्रकाशकांमधील स्पर्धेचा वाचकांना मात्र लाभ होत असून ही तीन अक्षरलेणी केवळ एक हजार रुपयांमध्ये आपल्या संग्रहामध्ये ठेवणे शक्य झाले आहे.
शिवाजी सावंत यांनी वयाच्या पंचविशीमध्ये लिहिलेल्या ‘मृत्युंजय’ या कादंबरीने मराठी साहित्यामध्ये ध्रुवताऱ्यासारखे अढळ स्थान प्राप्त केले. या कादंबरीमुळे शिवाजी सावंत यांच्या नावापुढे ‘मृत्युंजय’कार ही उपाधी लावली गेली. ५० वर्षांनंतरही ही कादंबरी तितकीच लोकप्रिय आहे याची साक्ष मिळत आहे. छत्रपती संभाजीमहाराज यांच्या जीवनावरील ‘छावा’ आणि भगवान श्रीकृष्ण यांच्यावरील ‘युगंधर’ या सावंत यांच्या दोन कादंबऱ्यांनाही तेवढीच पसंती मिळाली. कॉन्टिनेन्टल प्रकाशनने या तीनही कादंबऱ्या प्रकाशित केल्या होत्या.
शिवाजी सावंत यांच्या निधनानंतर सावंत कुटुंबीयांनी या कादंबऱ्यांच्या प्रकाशनाचे हक्क मेहता पब्लिशिंग हाउसला दिले. त्यामुळे कॉन्टिनेन्टल प्रकाशन आणि मेहता पब्लिशिंग हाउस या दोन प्रकाशकांमध्ये न्यायालयीन लढाई सुरू झाली. ती अजूनही सुरू असल्याने सध्या तरी दोन्ही प्रकाशकांकडे या पुस्तकांच्या प्रकाशनाचे हक्क आहेत. यामध्ये वाचकांचा मात्र लाभ होत असून सावंत यांच्या या कादंबऱ्या त्यांना सवलतीच्या दरामध्ये मिळत आहेत.
मेहता पब्लिशिंग हाउसने नव्या वर्षांची भेट म्हणून १३३५ रुपये किमतीच्या या तीन कादंबऱ्या वाचकांना केवळ एक हजार रुपयांमध्ये उपलब्ध करून दिल्या. एका महिन्यामध्ये पाच हजार संचांची विक्री झाली आहे. त्यामुळे एक आवृत्ती संपली असून पुढील आठवडय़ामध्ये दुसरी आवृत्ती प्रकाशित होणार आहे. काही पुस्तक विक्रेत्यांकडून ५०० संचांची ऑर्डर आली आहे, अशी माहिती सुनील मेहता यांनी दिली.
कॉन्टिनेन्टल प्रकाशनने मूळ किंमत दीड हजार रुपये असलेल्या या तीन कादंबऱ्या एक हजार रुपयांमध्ये उपलब्ध करून दिल्या आहेत. या कादंबऱ्यांना वाचकांचा उत्तम प्रतिसाद लाभत आहे. वाचक संचाच्या स्वरूपात त्याचप्रमाणे स्वतंत्रपणेही कादंबरी घेत असल्यामुळे पुस्तकांच्या विक्रीची संख्या निश्चितपणे सांगता येत नाही, असा देवयानी कुलकर्णी-अभ्यंकर यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 5, 2014 3:17 am

Web Title: recordbreak sale of mrutyunjay chava and yugandhar
Next Stories
1 शहराच्या पूर्व भागातील पहिले सुसज्ज नाटय़गृह
2 आम्हीही आम आदमीच- सुप्रिया सुळे
3 पाटील वाडय़ात.. इतिहासाचा अभ्यास
Just Now!
X