राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमधील भरती प्रक्रिया ही रिक्रुटमेंट बोर्डाच्या माध्यमातून करण्याच्या मागणीकडे दुर्लक्ष केले जात असताना राज्यातील कृषी महविद्यालयांमधील भरतीसाठी ‘महाराष्ट्र कृषी विद्यापीठ सेवाप्रवेश मंडळा’ची (रिक्रुटमेंट बोर्ड) स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे कृषी महाविद्यालयांमधील भरती प्रक्रियेतील अडचणी दूर होतील अशी आशा व्यक्त करण्यात येत आहे.
राज्यातील कृषी महाविद्यालयांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची अनेक पदे गेली काही वर्षे रिक्त होती. कृषी विद्यापीठांमध्ये विद्यापीठाच्या समित्यांच्या माध्यमातूनच प्राध्यापकांची आणि कर्मचाऱ्यांची भरती केली जात होती. मात्र, या भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता नसल्याची तक्रार विविध संघटनांकडून करण्यात येत होती. या पाश्र्वभूमीवर राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या आदेशानुसार रिक्रुटमेंट बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय राज्यशासनाने घेतला आहे. याबाबतचा अध्यादेश शासनाने नुकताच प्रसिद्ध केला आहे.
राज्यात सध्या चार कृषी विद्यापीठे असून ही विद्यापीठे आणि स्वायत्त संस्था यांच्यातील भरती रिक्रुटमेंट बोर्डाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. त्यामुळे कृषी महाविद्यालयांमधील भरती प्रक्रियेमधील गैरप्रकार कमी होतील अशी आशा व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर अनेक वर्षे रिक्त असलेल्या पदांच्या भरतीलाही चालना मिळणार आहे.