रेल्वेकडूनच एखादी गाडी रद्द झाल्यास प्रवाशाला तिकिटाचा संपूर्ण परतावा देणे बंधनकारक असताना करोनाच्या संसर्गामुळे रद्द झालेल्या गाडय़ांचा परतावा देताना अनेकांच्या तिकिटांच्या रकमेची कपात करण्यात आल्याचे समोर आले आहे.  त्याचप्रमाणे रेल्वेकडून १५ एप्रिलनंतरच्या तिकिटांचे बुकिंग सुरू करण्यात आले असले, तरी गाडय़ा सुरू होणार की नाहीत, याबाबत संभ्रम आहे. ‘तयारीत राहा’ इतकेच उत्तर वरिष्ठ पातळीवरून दिले जात असल्याचे रेल्वेचे अधिकारी खासगीत सांगत आहेत.

करोनाचा संसर्ग रोखण्याच्या दृष्टीने संपूर्ण देशामध्ये टाळेबंदी जाहीर झाल्यानंतर रेल्वेकडून सर्व गाडय़ा रद्द करण्यात आल्या. इंडियन रेल्वे केटरिंग अ‍ॅण्ड टुरिझम कार्पोरेशनने (आयआरसीटीसी) २२ मार्च ते १४ एप्रिल या कालावधीतील रेल्वे आरक्षण बंद करीत असल्याचे जाहीर केले. २२ मार्चपासून रद्द करण्यात आलेल्या गाडय़ांच्या तिकिटांचा परतावा प्रवाशांना देण्याचेही जाहीर करण्यात आले. रेल्वेच्या नियमानुसार १२० दिवस आधी ऑनलाइन किंवा इतर माध्यमातून आरक्षित करण्यात आलेले तिकीट प्रवाशाने स्वत: रद्द केल्यास कालावधीनुसार तिकिटाच्या रकमेतून कपात करून परतावा दिला जातो. मात्र, रेल्वेकडून गाडय़ा रद्द केल्यास तिकिटाचा संपूर्ण परतावा प्रवाशाला देणे बंधनकारक आहे. मात्र, २२ मार्चनंतर रद्द केलेल्या काही गाडय़ांच्या तिकिटाच्या रकमेचा परतावा देताना काही प्रमाणात रकमेची कपात करण्यात आल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. १५ एप्रिलनंतरही गाडय़ा रद्द झाल्यास पुन्हा प्रवाशांनाच त्याचा भरुदड सोसावा लागणार असण्याची शक्यता आहे.

रेल्वेने कोणतीही गाडी रद्द केल्यास प्रवाशाला तिकिटाच्या रकमेचा पूर्णपणे परतावा देणे बंधनकारक आहे. तिकिटाच्या रकमेत कपात करणे पूर्णपणे गैर आहे. त्याबाबत प्रवाशांनी तातडीने तक्रार दाखल करून पूर्ण परतावा मिळवावा. १५ एप्रिलनंतरचे रेल्वेचे ऑनलाइन आरक्षण सुरू करण्यात आले असले, तरी गाडय़ा सुरू होणार की नाहीत, हे कुणीही सांगत नाही. या गोंधळाचा फटका प्रवाशांनाच बसणार असल्याने रेल्वेने तातडीने सर्व गोष्टींचा खुलासा करावा. – हर्षां शहा, रेल्वे प्रवासी ग्रुप अध्यक्षा

पुणे-सोलापूर शताब्दी एक्स्प्रेससाठी मी २३ मार्चसाठी आरक्षण केले होते. मात्र, ही गाडी करोना संसर्गामुळे रद्द करण्यात आली. आरक्षण करताना तीन तिकिटांसाठी १२१७ रुपयांची आकारणी करण्यात आली होती. मात्र, परतावा ११७५ रुपये इतकाच देण्यात आला.

– सुरेश गोडबोले, प्रवासी