पुण्यात विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाची स्थापना; नांदेड सिटीतील कार्यालयाचे उद्घाटन

पोलिसांविरुद्ध सामान्य नागरिकांनी केलेल्या तक्रारींचा निवाडा करण्यासाठी पुण्यात विभागीय पोलीस प्राधिकरणाची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. निवृत्त न्यायाधीश या प्राधिकरणाचे अध्यक्ष म्हणून काम करणार असून स्वातंत्र्य दिनी नांदेड सिटीत प्राधिकरणाच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येणार आहे.

पोलीस खाते हे सामान्य नागरिकांशी सर्वाधिक संपर्क असलेले सरकारी खाते म्हणून ओळखले जाते. कारण कायदा-सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिसांना समाजात राहून त्यांचे काम करावे लागते. अन्य सरकारी खात्याप्रमाणे पोलिसांचे काम चार भिंतीत चालत नाही. त्यामुळे पोलीस शिपाई असो वा पोलीस अधिकारी. पोलीस दलात काम करताना त्यांच्यावर आरोप-प्रत्यारोप होत असतात. अर्थात प्रत्येक आरोपांमध्ये तथ्य असते, असे नसते. पोलिसांविरुद्ध आलेल्या तक्रारअर्जाचे प्रमाण वाढत आहे. एखाद्या पोलिसांनी दिलेली वागणूक, अरेरावी किंवा त्याने कमावलेल्या मालमत्तेविषयीच्या तक्रारी येत असतात. बऱ्याच तक्रारी या निनावी पत्राद्वारे केल्या जातात. ज्या तक्रारी निनावी आहेत, अशा तक्रारींची देखील घेतली जात नाही. तसे आदेश पोलीस महासंचालकांनी दिले आहेत. मात्र, काही तक्रारी एखाद्या व्यक्तीच्या नावाने येत असतात. अशा तक्रारींची शहानिशा करावी लागते. अशा स्वरूपाचे तक्रारअर्ज पोलीस आयुक्तालयात पाठविण्यात येतात. या तक्रारअर्जावरून पोलीस निरीक्षक, सहायक आयुक्त, उपायुक्त दर्जाचा अधिकारी चौकशी करतो. तक्रारीत तथ्य आढळल्यानंतर त्या संदर्भातील अहवाल वरिष्ठ अधिकाऱ्यांना पाठविला जातो. पोलिसांविरुद्ध आलेल्या तक्रारींचा निवाडा करण्यासाठी स्वतंत्र प्राधिकरणाचा प्रस्ताव विचाराधीन होता. पुण्यात विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाची स्थापना करण्यास गृह विभागाकडून नुकतीच मंजुरी देण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली.

सिंहगड रस्त्यावरील नांदेड सिटीत विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाचे कार्यालय सुरू करण्यात येणार आहे. या कार्यालयातील फर्निचरचे काम अंतिम टप्प्यात आले असून स्वातंत्र्य दिनी या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात येईल. प्राधिकरणाचे पूर्ण वेळ कामकाज पाहण्यासाठी निवृत्त न्यायाधीश, निवृत्त वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याची नेमणूक करण्यात आली आहे. पोलीस मुख्यालयाचे पोलीस उपायुक्त बी. जी. गायकर, सहायक पोलीस आयुक्त वैशाली जाधव-माने या पदसिद्ध अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे पोलीस शिपाई ते पोलीस अधिकाऱ्यांविरुद्ध आलेल्या तक्रारी स्वीकारल्या जाणार आहेत. तक्रारींची पडताळणी केल्यानंतर संबंधित पोलिसाला बाजू मांडण्याची संधी देण्यात येईल. त्यानंतर या संदर्भातील अहवाल पोलीस महासंचालकांकडे पाठवला जाणार आहे. त्यानंतर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून कारवाई करण्यात येणार आहे.

पाच जिल्ह्य़ांचे कामकाज पुण्यातून

पुणे, सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूर हे पाच जिल्हे पोलिसांच्या कोल्हापूर परिक्षेत्राच्या अखत्यारीत येतात. या पाच जिल्ह्य़ांमध्ये कार्यरत असलेल्या पोलिसांविरुद्धच्या तक्रारी विभागीय पोलीस तक्रार प्राधिकरणाकडे पाठवू शकतात. त्यासाठी तक्रारदार पुढे यायला हवा. निनावी तक्रारअर्जाचीही दखल घेतली जाणार आहे. एक प्रकारे या प्राधिकरणाच्या माध्यमातून पोलिसांवर करडी नजर राहणार आहे. नांदेड सिटीतील प्राधिकरणाच्या कामकाजाची वेळ सकाळी दहा ते सायंकाळी पाच अशी राहील.