पुण्यात महिन्याला २० हजारांऐवजी तीन हजारच नव्या दुचाकी

पुणे : सर्वाधिक वेगाने वाढणारी वाहने आणि लोकसंख्येपेक्षाही अधिक वाहनांची संख्या असलेल्या पुणे शहरामध्ये करोना विषाणू प्रादुर्भावाच्या काळात नव्या वाहनांच्या नोंदणीत लक्षणीय घट झाली आहे. पुणे आरटीओच्या आकडेवारीनुसार नव्या दुचाकीच्या नोंदणीत ८५ टक्क्य़ांहून अधिकच घट झाली आहे. एका महिन्याला सरासरी तब्बल २० हजार नव्या दुचाकींची भर पडत असलेल्या शहरात गेल्या एका महिन्यात तीन हजारांहून कमी दुचाकींची नोंदणी झाली आहे. नव्या मोटारींची नोंदणीही निम्म्याने कमी झाली आहे.

पुणे शहरामध्ये राज्यातील नव्हे, तर देशातील कोणत्याही शहराच्या तुलनेत वाहनवाढीचा वेग सर्वाधिक आहे. शहरातील रस्त्यांवर ३७ लाखांच्या आसपास वाहने धावतात. त्यात दुचाकींची संख्या ७५ टक्क्य़ांपर्यंत आहे. पुणे आरटीओमध्ये नव्या दुचाकींच्या नोंदणी क्रमांकाची दहा हजारांची एक मालिका दीड ते दोन आठवडय़ांमध्ये संपते. परिणामी एका महिन्यामध्ये २० हजारांच्या जवळपास नव्या दुचाकी शहरातील रस्त्यांवर दाखल होतात. दिवाळी आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रत्येक वर्षी आठ ते दहा हजार नव्या वाहनांची भर पडते. वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे पर्यावरण आणि वाहतुकीबाबत निर्माण होणाऱ्या प्रश्नांवर सातत्याने चिंता व्यक्त केली जाते. करोनाच्या टाळेबंदीनंतर मात्र ही स्थिती पूर्णत: बदलली असून, दुचाकीसह सर्वच नव्या वाहनांच्या नोंदणीत कमालीची घट झाली आहे.

टाळेबंदीनंतर प्रादेशिक परिवहन कार्यालयाचे कामकाज पूर्णपणे बंद करण्यात आले होते. १८ मेपासून मात्र नव्या वाहनांच्या नोंदणीशी संबंधित कामे सुरू करण्यात आली. १८ मे ते ३० जून या कालावधीतील पुणे आरटीओतील नव्या वाहनांच्या आकडेवारीनुसार सुमारे दीड महिन्याच्या कालावधीत शहरात ३९५६ नव्या दुचाकींची नोंदणी झाली. गेल्या अनेक वर्षांमध्ये ही आकडेवारी सर्वात कमी आहे. मोटारींची नोंदणी मात्र निम्म्यानेच घटली असून, दीड महिन्यांमघ्ये २०८३ नव्या मोटारींची नोंद झाली. याशिवाय सुमारे पाचशे इतर प्रकारातील वाहने नोंदली गेली. त्यातून आरटीओला ३० कोटी २३ लाखांचा महसूल मिळाला आहे.

पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयामध्ये सुमारे दीड महिन्यांच्या कालावधीत ३९५६ नव्या दुचाकी आणि २०८३ नव्या मोटारींची नोंदणी झाली. टाळेबंदी लागू होण्यापूर्वीपर्यंत आरटीओ कार्यालयात महिन्याला सुमारे २० हजार नव्या दुचाकींची नोंदणी होत होती. ती मोठय़ा प्रमाणावर घटली आहे. नव्या मोटारींची नोंदणीही निम्म्याने कमी झाली आहे.

– संजीव भोर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी