16 October 2019

News Flash

विक्रेता-खरेदीदाराच्या नावानेही मालमत्ता व्यवहाराचा शोध

राज्यात नोंदणी मुद्रांक शुल्क विभागामार्फत सुविधा

(संग्रहित छायाचित्र)

|| प्रथमेश गोडबोले

राज्यात नोंदणी मुद्रांक शुल्क विभागामार्फत सुविधा

राज्य नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाकडून एखाद्या मालमत्तेबाबत पूर्वी नोंदवलेला दस्त शोधायचा असेल तर संबंधित मालमत्तेची विक्री करणारा आणि खरेदीदार यांचे नाव देऊनही संबंधित दस्त यापुढे शोधता येणार आहे. संबंधित विभागाकडून ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली असून यापूर्वी मिळकतीचा क्रमांक किंवा दस्ताच्या क्रमांकावरून पूर्वीचे व्यवहार शोधता येत होते.

जमीन, सदनिका आणि दुकानांच्या खरेदी-विक्री व्यवहारातील गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी नोंदणी आणि मुद्रांक शुल्क विभागाने ई-सर्च ही संगणक प्रणाली विकसित केली आहे. एखाद्या मालमत्तेबाबत नोंदणी विभागाकडे पूर्वी नोंदवलेला दस्त नोंदणी विभागाच्या www.igrmaharashtra.gov.in या संकेतस्थळावरून शोधण्याची सुविधा ई-सर्च या प्रणालीत आहे. मिळकतीच्या क्रमांकावरून किंवा दस्ताच्या क्रमांकावरून पूर्वीचे व्यवहार शोधण्याची सुविधा विभागाच्या संकेतस्थळावर ऑनलाइन सव्‍‌र्हिस या सदराखाली उपलब्ध आहे. त्यामध्ये आता मालमत्तेची विक्री करणारा आणि खरेदीदार यांची नावे देऊनही शोध घेता येणार आहे.

या सुविधेसाठी ई-सर्चमध्ये खरेदीदार, विक्रेता हे पर्याय देण्यात आले आहेत. कोणत्याही मिळकतीचा व्यवहार करण्यापूर्वी त्या मिळकतीच्या मालकी हक्कात झालेले बदल तपासणे खरेदीदाराच्या हिताचे असते. पूर्वी बदल तपासण्यासाठी संबंधित कार्यालयात जाऊन शोध घेणे गरजेचे होते. सामायिक कार्यक्षेत्रात (कन्करंट ज्युरिडिक्शन) एकापेक्षा अधिक कार्यालये असतात. त्यामुळे नागरिकांना अशा कार्यक्षेत्रातील व्यवहारांचा शोध घेण्यासाठी त्रास होत असे. या पाश्र्वभूमीवर ई-सर्चच्या माध्यमातून नागरिकांच्या सोयीसाठी २००२ नंतर संगणकीकृत पद्धतीने नोंदवलेल्या सर्व दस्तांचा शोध ई-सर्चद्वारे घेण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

ई-सर्च या संगणक प्रणालीवर आतापर्यंत जिल्हा, तालुका, सर्वेक्षण क्रमांक, गटक्रमांक दिल्यानंतर संबंधित मालमत्तेचा शोध घेता येत होता. त्यामध्ये आता विक्री करणारा आणि खरेदीदार यांचे नाव, असे पर्याय देण्यात आले आहेत. मात्र, विक्री करणारा आणि खरेदीदार यांचे नाव केवळ संबंधित सर्वेक्षण क्रमांक, गटक्रमांकापुरतेच मर्यादित आहेत. त्यामुळे शोध लवकर करता येणार आहे, तसेच शोध मर्यादित राहणार आहे.    – अनिल कवडे, नोंदणी महानिरीक्षक, मुद्रांक नियंत्रक, महाराष्ट्र राज्य

First Published on April 14, 2019 12:08 am

Web Title: registration stamp duty