‘भाई : व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटात गानहिरा हिराबाई बडोदेकर, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी या बुजुर्ग कलाकारांवर चित्रित करण्यात आलेले प्रसंग हीन दर्जाचे आहेत. त्यामुळे त्यांच्या कलेबद्दल भीषण गैरसमज निर्माण होण्याची शक्यता असल्याने आपल्या दैवतांचे असे विद्रूपीकरण रसिकांनी खपवून घेऊ नये, असे आवाहन या ज्येष्ठांच्या कलेचाही वारसा पुढे नेणाऱ्या कलावंतांनी मराठी रसिकांना केले आहे.

गानहिरा हिराबाई बडोदेकर यांचे नातू आणि प्रसिद्ध तबलावादक निशिकांत बडोदेकर, स्वरभास्कर पं. भीमसेन जोशी यांचे पुत्र आणि प्रसिद्ध गायक श्रीनिवास जोशी तसेच हिराबाई बडोदेकर यांची नात आणि प्रसिद्ध गायिका मीना फातर्पेकर यांनी पत्रकाद्वारे या चित्रपटातील काही प्रसंगांना आक्षेप घेतले आहेत.

आपल्या अत्युच्च दर्जाच्या कलेने बडोदेकर आणि जोशी या महान कलावंतांनी भारतीय अभिजात संगीतामध्ये जी मोलाची भर घातली आहे त्याची बूज तर सोडाच, परंतु त्यांच्याबद्दल समाजात हीन समज होण्यास ‘भाई : व्यक्ती की वल्ली’ हा चित्रपट कारणीभूत ठरत आहे. ज्या काळात स्त्रियांना अभिजात संगीताच्या मैफलींना जाण्यासही परवानगी नाकारली जात होती, त्या काळात हिराबाईंनी मैफलीच्या मध्यभागी बसून आपली कला सादर केली आणि स्त्रियांच्या कलास्वातंत्र्याला व्यासपीठ मिळवून दिले. ही घटना केवळ संगीताच्या क्षेत्रापुरतीच मर्यादित नव्हती तर, त्यामुळे सामाजिक क्रांती अधिक वेगवान होण्यासही मदत झाली. अशा महान कलावंताचे घर हे दारू मिळण्याचे ठिकाण कसे असू शकते, असा सवाल बडोदेकर यांनी उपस्थित केला आहे.

आपल्या कलेने साऱ्या जगाला कवेत घेणाऱ्या पं. भीमसेनजी यांची चित्रपटात रेखाटलेली व्यक्तिरेखा पाहून त्यांच्या कलेबद्दल भीषण गैरसमज निर्माण होण्याची शक्यता आहे, असे श्रीनिवास जोशी यांनी स्पष्ट केले.

प्रतिकूल परिस्थितीतही हिराबाईंनी संगीताची सेवा केल्यामुळे सर्व कलाकारांसाठी त्या देवासमान झाल्या. त्यांच्याबद्दल सारे कलाकार एकेरी भाषेत स्वप्नातही बोलू शकणार नाहीत. हे केवळ भयंकरच नाही तर या कलाकारांचा घोर अपमान करणारे आहे.
– निशिकांत बडोदेकर