एका गुन्ह्यात नितीन आरोळेंना तुरुंगवासाची शिक्षा झाली, २०१५ मध्ये त्यांची रवानगी येरवडा कारागृहात झाली, गायनाची आवड असलेल्या नितीन आरोळे यांनी तुरुंगातही ही कला जोपासली, गायनाच्या सरावात त्यांनी खंड पडू दिला नाही..,.महिनाभरापूर्वीच त्यांची तुरुंगात सुटका झाली.. शुक्रवारी भाऊबीजेला त्यांनी पुण्यात गायनाचा कार्यक्रम सादर केला असून तुरुंगातून सुटका झाल्यानंतरचा हा त्यांचा पहिलाच कार्यक्रम ठरला. नितीन आरोळेंच्या गायनाने रसिकांचीही दाद मिळवली.

पुण्यातील अग्निशामक दलाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा भाऊबीजेनिमित्त एक कार्यक्रम शुक्रवारी पार पडली. या कार्यक्रमात महिलांनी अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना ओवाळले. यानंतर नितीन आरोळेंच्या गायनाचा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमानंतर नितीन आरोळेंनी त्यांचा प्रवास ‘लोकसत्ता ऑनलाइन’शी बोलताना उलगडला.

पुण्यातील भोई प्रतिष्ठानच्या माध्यमातून येरवडा कारागृहातील कैद्यांसाठी प्रेरणा उपक्रम राबविला जातो. या उपक्रमा अंतर्गत सामाजिक, कला क्षेत्रातील व्यक्तीच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. या कार्यक्रमादरम्यान एका गुन्ह्यात शिक्षा भोगत असलेले नितीन आरोळे यांना गाणं सादर करण्याची संधी मिळाली. आरोळे यांनी प्रेरणा पथ उपक्रमा अंतर्गत झाकीर हुसेन यांच्यासमोर काही गाणी देखील सादर केली. आरोळे यांची सुरेल गाणी ऐकून झाकीर हुसैन यांनीही कौतुक केले.

खुद्द उस्तादांनी ‘वाह’ म्हणत कौतुकाची थाप पाठीवर दिल्यानंतर नितीन आरोळेंनी मागे वळून न पाहता कारागृहाअंतर्गत घेण्यात आलेल्या अनेक कार्यक्रमामध्ये सहभाग घेतला. तसेच हिवाळी अधिवेशना दरम्यान नागपूर येथे बंदी कला रजनीच्या १५ जणांच्या टीममध्ये सहभागी होऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर गाण सादर केले. मुख्यमंत्र्यांनी देखील या टीमचे कौतुक केले होते.

गेल्या महिन्यात नितीन आरोळे यांची येरवडा कारागृहातून सुटका झाली. कारागृहातून सुटका झाल्यावर आरोळे यांचा पहिला गायनाचा कार्यक्रम शुक्रवारी पार पडला. भोई प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी अग्निशामक दलाच्या अधिकारी आणि कर्मचारी वर्गा समवेत भाऊबीज साजरी करण्यात येते. त्यावेळी आरोळे यांनी सुरेल गाणी सादर केली आणि रसिकांनाही टाळ्या वाजवत त्यांच्या गायनाला दाद दिली.

नितीन आरोळे सांगतात, एका गुन्ह्यामध्ये २०१५ मध्ये शिक्षा झाली. त्यानंतर तुरुंगातील चार भिंतींमधील आयुष्य खूप भीतीदायक होते. यादरम्यान प्रेरणा पथ कार्यक्रमावेळी झाकीर हुसेन यांच्या समोर गाणे सादर केले आणि माझा आत्मविश्वास दुणावला. तुरुंगात राहूनही माझ्यातील कला सादर करू शकतो, असा विश्वास निर्माण झाला आणि तेथून पुन्हा गायनाकडे वळलो. आता कारागृहातून बाहेर पडल्यावर नव्या आयुष्याला सुरुवात करत आहे.आज ज्या प्रकारे अग्निशामक अधिकाऱ्यांसमोर गाण सादर करण्याची संधी मिळाली. तशाच प्रकारे भविष्यात देखील अनेक संस्थाना गायनाच्या माध्यमातून सेवा करण्याचे काम करणार असल्याचे त्यांनी सांगितले.