दुकाने उघडण्यास परवानगी; नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना

पुणे : शहराच्या प्रतिबंधित भागात येत असलेल्या व्यापारी पेठेतील दुकाने उघडण्यास मंगळवारी प्रशासनाने मुभा दिली. करोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी लागू करण्यात आलेल्या नियमावलीचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

महापालिका प्रशासन, व्यापारी महासंघाचे पदाधिकारी आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत प्रतिबंधित भागातील दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. शहरातील नाना-भवानी पेठ, टिंबर मार्केट, शंकरशेठ रस्ता, गणेश पेठ, नेहरू चौक, गुरुवार पेठेतील भांडे आळी, सोन्या मारुती चौक, मोती चौक, फडके हौद चौक, रास्ता पेठ, नेहरू रस्ता भागाचा समावेश व्यापारी पेठेत हातो. करोनाचा संसर्ग वाढीस लागल्यानंतर या भागातील इलेक्ट्रॉनिक, लोखंडी साहित्य, प्लायवुड, स्टेनलीस स्टील तसेच जीवनावश्यक वस्तूंची विक्री करणारी दुकाने बंद ठेवण्यात आली होती. जवळपास तीन महिने व्यापारी पेठेतील व्यवहार ठप्प होते. प्रतिबंधित भाग वगळता शहरातील अन्य दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली होती. मात्र, व्यापारी पेठेतील व्यवहार बंद ठेवण्यात आले होते.

व्यापारी पेठ नियमांचे पालन करून पुन्हा सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी. व्यापारी तसेच कामगार वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे प्रतिबंधित भागातील दुकाने उघडण्यास मुभा द्यावी, अशी मागणी पुणे शहर व्यापारी महासंघाकडून प्रशासनाकडे करण्यात आली होती. मंगळवारी पार पडलेल्या बैठकीत प्रतिबंधित भागातील दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. विशेष नियुक्त अधिकारी सौरभ राव यांनी या बैठकीत माहिती

दिली. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयातील बाधित रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यात यश आले आहे. त्यामुळे या भागातील व्यवहार पुन्हा सुरू करण्यास मुभा देण्यात आली, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

महापालिका आयुक्त शेखर गायकवाड, सहआयुक्त  शंतनु गोयल, अतिरिक्त पोलीस आयुक्त डॉ. संजय शिंदे, अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक आयुक्त मिलिंद पाटील, शहर अभियंता प्रशांत वाघमारे, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका, सचिव महेंद्र पितळीया, उपाध्यक्ष रतन किराड, सुभाष संघवी, मनोज सारडा, जयंत शेटे, हेमंत शहा, विपुल अष्टेकर, प्रसाद देशपांडे, अजित सांगळे, प्रमोद शहा आदी या प्रसंगी उपस्थित होते.

नियमांचे पालन न केल्यास  व्यापाऱ्यांवर कारवाई

दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली असली, तरी व्यापाऱ्यांनी नियमांचे काटेकोरपणे पालन करावे. सामाजिक अंतर पाळण्यात यावे तसेच मुखपट्टी आणि जंतुनाशकांचा वापर करण्यात यावा. प्रत्येक व्यापाऱ्याने तापमापकाद्वारे कामगार, ग्राहक तसेच स्वत:ची तपासणी करावी. या नियमांचे काटेकोरपणे पालन होते का नाही, याबाबतची पाहणी करण्यासाठी प्रशासन आणि व्यापाऱ्यांची संयुक्त समिती स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला. नियमांचे पालन न करणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला, अशी माहिती व्यापारी महासंघाचे अध्यक्ष फत्तेचंद रांका आणि सचिव महेंद्र पितळीया यांनी दिली.