News Flash

जगात सर्वाधिक हिंसा धर्माच्या नावाखाली – डॉ कोत्तापल्ले

धर्माच्या नावाखाली जितका हिंसाचार झाला, तेवढा दुसऱ्या कोणत्याही कारणाने झाला नाही. दोन महायुद्धात न झालेली हिंसा धर्मयुद्धांमुळे झाली.

| July 8, 2013 02:55 am

धर्माच्या नावाखाली जितका हिंसाचार झाला, तेवढा दुसऱ्या कोणत्याही कारणाने झाला नाही. दोन महायुद्धात न झालेली हिंसा धर्मयुद्धांमुळे झाली. तरीही धर्म ही आवश्यक बाब बनून राहिली आहे. जाती-धर्माच्या पलीकडे जाऊन विचार करण्याची व स्पष्ट भूमिका घेण्याची वेळ आली आहे, असे प्रतिपादन मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले यांनी आकुर्डीत केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या पिंपरी शाखेचा द्विदशकपूर्ती सोहळा व अंधश्रद्धा निर्मूलन या विषयावरील पहिल्या साहित्य संमेलनात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे होते. यावेळी समितीचे संस्थापक कार्याध्यक्ष नरेंद्र दाभोलकर, पुणे जिल्हा अध्यक्ष डॉ. राजेंद्र कांकरिया, पिंपरीचे अध्यक्ष दिनकर साळुंके, मनीषा महाजन आदी उपस्थित होते.  
कोत्तापल्ले म्हणाले, अंधश्रद्धा निर्मूलनाचा व्यापक दृष्टिकोन असलेले संमेलन कोणत्याही जातीधर्माचे नसून त्यापलीकडे जाऊन वेगळा संदेश देणारे आहे. समाजात जाऊन वेगळी भूमिका मांडणारे दाभोलकर यांच्यासारखे कमीच आहेत. अंधश्रद्धेच्या समस्येच्या मुळाशी जाण्याची गरज आहे. मात्र, वेळखाऊ, अवघड व यशाची खात्री नसलेली ती प्रदीर्घ प्रक्रिया आहे. आपल्या भोवताली ९० टक्के नागरिक धर्माच्या कल्पनेने प्रभावित असतात. जीवनातील अनेक वाईट गोष्टींचा उगम धर्मातून होतो. प्राचीन प्रथा परंपरेचा आधार धर्म हाच असतो. धर्माचेच जात व पोटजात हे एक अंग असते. भारतीयांवरील संस्कारामुळे अनैतिक गोष्टी नैतिक तर अपवित्र गोष्टी त्यांना पवित्र वाटतात. आपल्या जगण्यावर धर्माचा प्रभाव व जातीची दहशत आहे. २१ व्या शतकात असलो तरी आपण धर्म-जात पाळतोच, त्यातून उच्चशिक्षितही सुटले नाहीत. कारण, जातीत विभागून राहणे यातच समाजाला सुरक्षितता वाटते. मोठे सेलिब्रेटी देवदर्शनाला जातात, त्याला प्रसिद्धी मिळते, त्याचा सामान्यांवर प्रभाव पडतो. अमिताभ बच्चनसारखा ‘अँग्री यंग मॅन’ पहाटे पाच वाजता उठून पायी सिद्धिविनायकला जातो. किलो-किलोचे सोने दान करणारे भाविक असतात. चित्रपटात नायकाची आई देवाचा धावा करते आणि देव पावतो. कोणतीही वाहिनी सुरू करा, बुवा-बायांचा परिणाम दिसतो. अमानुष वाटू शकतील, अशा गोष्टी जाहीरपणे ते बोलतात. बुवा-महाराजांच्या कार्यक्रमांना दोन हजारांची तिकिटे काढून हजारो लोक गर्दी करतात. हे पाहता विचारांची सर्व साधने वापरून समाजाला मागे नेण्याचा प्रयत्न सुरू आहे, असेच वाटते. वेगवेगळ्या प्रकारची जवळपास १५० संमेलने होतात. त्यापैकी अनेक परस्परविरोधी वाटतात. उद्योगपतींचे व कामगारांचे संमेलन त्यापैकी एक असते.  दोन्हीकडे हजेरी लावणारे लेखक परस्परविरोधी विचार मांडतात, कारण अनेक लेखकांना स्वत:चा चेहराच नाही. लेखकाकडे जीवनाकडे पाहण्याची दृष्टी हवी. समाजाकडे, संस्कृतीकडे तो कसा पाहतो, ते महत्त्वाचे आहे. लेखकांची दृष्टी बदलल्यास मराठीत चांगले साहित्य निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 8, 2013 2:55 am

Web Title: religion is the main reason behind violence kottapalle
टॅग : Religion
Next Stories
1 ‘घरकुल’ च्या जागेचे ११४ कोटी पिंपरी पालिकेला देण्याच्या विषयातून राज्य शासनाने अंग झटकले
2 आमदार विनायक निम्हण यांच्यावर ज्येष्ठ नागरिकाला मारहाणीचा गुन्हा
3 ‘जीए’ हे तत्त्वचिंतक लेखक – प्रा. रा. ग. जाधव
Just Now!
X