महापालिकेचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि थकित मिळकत कर वसुलीसाठी अभय योजना जाहीर करण्यात आली असली, तरी या योजनेत काही त्रुटी असल्यामुळे त्या दूर कराव्यात अशी मागणी भारतीय जनता पक्षातर्फे करण्यात आली आहे.
थकित मिळकत कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे अभय योजना जाहीर करण्यात आली आहे. तसे परिपत्रकही कर संकलन विभागातर्फे काढण्यात आले आहे. मात्र या योजनेत त्रुटी असल्यामुळे त्या दूर करणे आवश्यक आहे, असे निवेदन भाजपच्या नगरसेविका मुक्ता टिळक यांनी गुरुवारी महापालिका आयुक्तांना दिले. ज्या मिळकतींची कर आकारणी सध्या होत नाही, अशा मिळकतींचा वापर दिनांक लक्षात घ्यावा आणि त्या दिनांकापासून सहा वर्षे मागे जाऊन वाजवी भाडे दराने करआकारणी करावी, अशी सूचना टिळक यांनी केली आहे. ज्यांनी अनेक वर्षे करआकारणी करून घेतलेली नाही; पण प्रत्यक्ष जागेचा वापर सुरू आहे तसेच ज्यांच्याकडे काम सुरू करण्याचे प्रमाणपत्र व जोते तपासणी दाखला आहे; पण भोगवटापत्र नाही अशांकडून तीनपट कर आकारणी न करता नियमित दराने करआकारणी करावी, अशी विनंती आयुक्तांना देण्यात आलेल्या पत्रातून करण्यात आली आहे.
ज्या मिळकतींची प्रत्यक्ष वापर सुरू आहे तसेच ज्यांच्याकडे काम सुरू करण्याची परवानगी आहे तसेच ज्यांच्याकडे जोते तपासणी दाखला आहे परंतु भोगवटापत्र नाही अशा मिळकतींकडून तीनपट दराने कर आकारणी केली जात आहे. त्यांची मागील तीनपट कर आकारणी तशीच कायम ठेवून चालू आर्थिक वर्षांपासून अशा मिळकत धारकांना नियमित दराने कर आकारणी करावी, अशीही मागणी टिळक यांनी केली आहे. या प्रक्रियेत नागरिकांनी मिळकत कर लागू व्हावा म्हणून स्वत:हून अर्ज केले आहेत त्यांची तीनपट कर आकारणी कायम राहिल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे. तसेच ज्यांनी अशा प्रकारे अर्ज केला नव्हता त्यांना नियमित दराने कर आकारणी होत आहे. त्यामुळे अभय योजनेच्या परिपत्रकाचा पुनर्विचार करावा, अशीही मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.