संपूर्ण शहरभर स्टॉल आणि टपऱ्यांचे अतिक्रमण जोरात सुरू असताना आणि या अतिक्रमणांना 14ds02नगरसेवकांचे भरभक्क पाठबळ मिळत असताना महापालिकेने भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या कार्यकक्षेतील बेकायदेशीर स्टॉल हटवावेत, अशी मागणी एका नगरसेवकानेच केली आहे. अतिक्रमणांवर लोकप्रतिनिधींमुळे कारवाई करता येत नाही असा पवित्रा दर वेळी घेणारे महापालिका प्रशासन काय करणार याकडे आता लक्ष लागले आहे.
शहरात गेल्या दोन महिन्यांपासून सर्वत्र अतिक्रमणे जोरात सुरू आहेत आणि त्यातही खाद्यपेयांचे स्टॉल व टपऱ्यांचे अतिक्रमण लक्षणीय आहे. बहुतेक महत्त्वाचे चौक, गर्दीचे रस्ते, गल्लीबोळ येथील जागा स्टॉलनी बळकवल्या असून जागोजागी झालेल्या अतिक्रमणांमुळे रहदारीलाही अडथळा होत आहे. त्या बरोबरच पदपथांवर झालेली अतिक्रमणे पादचाऱ्यांना त्रासदायक ठरत आहेत.
अतिक्रमणांवर कारवाई करताना स्थानिक लोकप्रतिनिधींचा अडथळा होतो असा पवित्रा नेहमी महापालिकेचे अधिकारी घेतात आणि त्यात अनेकदा तथ्यही असते. मात्र, काँग्रेसचे प्रदेश सचिव आणि नगरसेवक संजय बालगुडे यांनी एक पत्र अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांना दिले असून अतिक्रमणे हटवण्याची मागणी त्यांनी या पत्रातून केली आहे. भवानी पेठ क्षेत्रीय कार्यालयाच्या कक्षेत मोठय़ा प्रमाणावर बेकायदेशीर बांधकामे झाली असून रस्त्यावर अतिक्रमणेही झाली आहेत. या भागातून जाणाऱ्या नैसर्गिक नाल्यावर सिमेंटचे स्लॅब महापालिकेच्या निधीतून टाकण्यात आले आहेत आणि त्यावरही अतिक्रमणे झाली आहेत. याबाबत अनेकदा तक्रार केली आहे. मात्र कोणतीही कारवाई होत नाही. त्यामुळे राज्य शासनाच्या कायद्यानुसार संबंधित क्षेत्रीय अधिकाऱ्याला जबाबदार धरून पुढील कार्यवाही करावी अशी मागणी या पत्रातून बालगुडे यांनी केली आहे.

 
घोरपडे उद्यानाच्या परिसरात अनेक अतिक्रमणे झाली आहेत. या अतिक्रमणांमुळे पदपथही बंद झाले आहेत. त्यातच आता उद्यानासमोर नव्याने काही स्टॉल आणून तेथे ते बसवण्यात आले आहेत. या अतिक्रमणांवर कारवाई झाली पाहिजे.
संजय बालगुडे
नगरसेवक