पुणे जिल्ह्य़ातील अपंग शाळांमधील शिक्षकांचे वेतन गेल्या पाच महिन्यांपासून रखडले असून पुणे जिल्हा परिषद आणि अपंग कल्याण विभागामध्ये याबाबत टोलवाटोलवी सुरू आहे.
पुणे जिल्ह्य़ातील ५१ अपंग शाळांतील ८५० शिक्षकांचे पगार पाच महिन्यांपासून रखडले आहेत. नोव्हेंबर २०१३ नंतर शिक्षकांचे पगार झालेले नाहीत. तर काही शिक्षकांचे पगार हे जानेवारी महिन्यापासून रखडले आहेत. याबाबत पुणे जिल्हा परिषद अपंग कल्याण विभागाकडे बोट दाखवत आहे आणि अपंग कल्याण विभाग पुणे जिल्हा परिषदेला दोषी ठरवत आहे. अपंग कल्याण विभागाकडून पगार होत नसल्याचे उत्तर जिल्हा परिषदेकडून शिक्षकांना देण्यात आले आहे. मात्र, जिल्हा परिषदेने शिक्षकांच्या पगाराची बिले वेळेत न पाठवल्यामुळे पगार रखडले असल्याचे अपंग कल्याण विभागाकडून सांगण्यात येत आहे. जिल्हा परिषदेकडून बिले आली असून त्याबाबत लवकरच पुढील कार्यवाही पूर्ण होऊन शिक्षकांना त्यांचे पगार मिळतील, असे अपंग कल्याण विभागातील अधिकाऱ्यांनी सांगितले.
या प्रशासकीय गोंधळामुळे शिक्षकांवर मात्र उपासमारीची वेळ आली आहे. अपंग शाळांमधील शिक्षकांच्या पगाराबाबत सातत्याने नवे गोंधळ समोर येत आहेत. बोगस युनिट वाटप केल्यामुळे राज्यातील अनेक शाळांमधील शिक्षकांचे पगार अद्यापही रखडलेलेच आहेत. शिक्षण विभाग, अपंग कल्याण विभाग यांच्यातील गोंधळाचा फटका शिक्षकांना बसत आहे.