मल्टिप्लेक्सप्रमाणे झळाळी; नूतनीकरणाचा १४ कोटींचा आराखडा तयार

पिंपरी-चिंचवड शहरातील सामाजिक संस्था, संघटना आणि राजकीय पक्षांचे कार्यक्रम घेण्याचे हक्काचे ठिकाण असलेल्या रामकृष्ण मोरे नाटय़गृहाचा आता कायापालट होणार आहे व त्यासाठी तब्बल १४ कोटी रूपये खर्च करण्यात येणार आहे. बहुपडदा चित्रपटगृहाप्रमाणे (मल्टिप्लेक्स थिएटर) नाटय़गृह दिसणार असून तसा आराखडा तयार करण्यात आला आहे. नूतनीकरणाचे काम सुरू झाल्यानंतर साधारणपणे वर्षभर नाटय़गृह बंद ठेवावे लागणार आहे. नाटय़गृहाच्या मूळ प्रश्नांकडे कधीही लक्ष न देणाऱ्या अधिकाऱ्यांनी संभाव्य टक्केवारीचा लाभ लक्षात घेऊन या खर्चिक नूतनीकरणात भलतेच स्वारस्य दाखवले आहे.

सर्वार्थाने सोयीचे असलेल्या चिंचवड नाटय़गृहाला सर्वाधिक मागणी आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा कार्यक्रम असो, की भाजपच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक असो; चिंचवड नाटय़गृहावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे. शहरातील कोणताही मोठा कार्यक्रम याच वास्तूत होतो. त्यामुळे नाटय़गृहाची तारीख मिळवणे हे एकप्रकारचे दिव्य मानले जाते. असे असतानाही नाटय़गृह म्हणजे समस्यांचे माहेरघर बनून राहिले आहे. स्वच्छतागृहांची दरुगधी, मेकअप रूमची दुरवस्था, कायम बिघडणारे ध्वनिक्षेपक, मोक्याच्या क्षणीच न चालणारी वातानुकूलित यंत्रणा, अपुरे वाहनतळ, तिकीट खिडकीची गैरसोयीची जागा अशा अनेक समस्या भेडसावतात. कलाकार नेहमी तक्रारी करतात. नाटय़गृह व्यवस्थापनाकडून वरिष्ठांकडे पाठपुरावा केला जातो, मात्र संबंधित विभागाच्या ‘साहेब’ मंडळींनी कधी ढुंकूनही त्याकडे पाहिले नाही. आता मात्र, विद्युत आणि स्थापत्य विभागातील अधिकाऱ्यांनी एकत्र येऊन १४ कोटी खर्चाचा घाट घातला आहे. प्रस्तावित नूतनीकरणात विद्युतची सहा कोटींची तर स्थापत्य विभागाची आठ कोटींची कामे काढण्यात येणार आहेत.

नाटय़गृहाला मल्टिप्लेक्सप्रमाणे झळाळी दिली जाणार असल्याचा दावा करण्यात येत आहे. त्यासाठी नाटय़गृहात खूप बदल प्रस्तावित आहेत. सध्याचे नाटय़गृहाचे जे कार्यालय (ऑफिस) आहे, तेथे नवीन प्रवेशद्वार करण्यात येणार आहे. खुच्र्याची संख्या कमी करण्यात येणार असून नाटय़गृहाची अंतर्गत रचना पूर्णपणे बदलण्यात येणार आहे. याबाबतचा प्रस्ताव तयार आहे, त्यानुसार प्राथमिक स्तरावर काम सुरू करण्यात आले आहे. मान्यतेची औपचारिकता बाकी आहे. ती गृहीत धरण्यात आली आहे. सांगवीचे नियोजित नाटय़गृह सुरू झाल्यानंतर चिंचवडचे नाटय़गृह बंद करण्यात येणार आहे. वर्षभरात नूतनीकरणाचे काम उरकण्याचे नियोजन आहे. या कालावधीत रसिक प्रेक्षकांची, नाटक कंपन्यांची तसेच नाटय़गृहाचे नियमित लाभ घेणाऱ्या संस्थांची प्रचंड गैरसोय होणार आहे. मात्र, नाटय़गृहाचा कायापालट महत्त्वाचा मानून अधिकाऱ्यांनी इतर सर्व गोष्टींकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष केले आहे.