News Flash

महात्मा फुले वाडय़ाला नवी झळाळी

समता भूमी हा लौकिक प्राप्त झालेल्या वाडय़ाच्या नूतनीकरणाचे काम गतीने सुरू आहे.

सामाजिक सुधारणांचे अग्रणी महात्मा जोतिराव फुले यांचे निवासस्थान असलेल्या महात्मा फुले वाडय़ाला आता नवी झळाळी मिळणार आहे. समता भूमी हा लौकिक प्राप्त झालेल्या वाडय़ाच्या नूतनीकरणाचे काम गतीने सुरू असून त्यासाठी ४ कोटी ६५ लाख रुपयांची आर्थिक तरतूद करण्यात आली आहे. अर्थात हे काम करताना मूळच्या वास्तूचे जतनीकरण करण्यात येणार असून मार्चअखेरीपर्यंत राष्ट्रीय स्मारक असलेला फुले वाडा गतवैभवाने दिमाखात उभा राहणार आहे.
स्त्रीशिक्षणाचे प्रणेते महात्मा फुले यांची शनिवारी (२८ नोव्हेंबर) शतकोत्तर रौप्यमहोत्सवी पुण्यतिथी साजरी होत आहे. त्यांच्या वास्तव्याने पावन झालेला पूर्वीच्या गंज पेठ येथील महात्मा फुले वाडा आणि परिसराच्या नूतनीकरणाच्या कामाची माहिती समोर आली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे गणपतीनंतर या कामाला प्रारंभ झाला असून त्यासाठी राज्य सरकारने ४ कोटी ६५ लाख रुपयांची आर्थिक तरतूद केली आहे. त्यापैकी पहिला टप्पा म्हणून २ कोटी ३५ लाख रुपयांचा निधी मिळाला असून त्यातून फुले वाडय़ाच्या नूतनीकरणाचे काम आता गतीने सुरू आहे. प्रत्यक्षात फुले यांच्या निवासस्थानाच्या छताची (फॉल सििलग) दुरुस्ती करण्यात आली आहे. हे छत नव्याने करताना ते मूळ वास्तूच्या कौलांप्रमाणेच असावे याची दक्षता घेतली गेली आहे, अशी माहिती विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
वास्तूचे नूतनीकरण करताना वाडय़ाचे प्रवेशद्वार नव्याने करण्यात येणार आहे. त्याचबरोबरीने वाडा परिसराला असलेले सध्याचे तारेचे कुंपण बदलून त्याजागी बंदिस्त भिंत उभारली जाणार आहे. या भिंतीवर महात्मा फुले यांच्या जीवनातील प्रसंगांवर प्रकाश टाकणाऱ्या नावीन्यपूर्ण चित्रे आणि निसर्गचित्रे असतील. समता भूमीला भेट देणाऱ्या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा, स्त्री आणि पुरुषांसाठी स्वच्छतागृहांची सोय करण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांची ही अडचण दूर होणार आहे. वाडा परिसरात असलेल्या महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या अर्धपुतळ्याला मेघडंबरी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे फुले यांचे स्मारक असलेल्या वृंदावनाला मेघडंबरी करण्यात येणार आहे. आता उर्वरित निधी लवकरात लवकर प्राप्त करून घेण्यात येणार असून या वास्तूला नवीन झळाळी देताना त्याचे मूळ स्वरूप जतन करण्यावर प्रामुख्याने भर दिला आहे, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

फुले वाडा ते राष्ट्रीय स्मारक
महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणांचे आद्य प्रवर्तक महात्मा फुले यांच्या जीवनातील अनेक घटनांशी आणि त्यांच्या सामाजिक चळवळीशी फुले वाडय़ाचे अतूट नाते आहे. याच वाडय़ामध्ये फुले यांचे वास्तव्य होते. येथेच त्यांनी बालविवाहानंतर विधवा झालेल्या अनेक महिलांची बाळंतपणे केली होती. त्यापैकीच यशवंत या मुलाला त्यांनी दत्तक घेतले होते. फुले यांच्यानंतर अर्जुना पाटील यांच्याकडे या वाडय़ाची मालकी होती. १९२२ मध्ये श्री सावतामाळी फ्री बोडिर्ंगचे आश्रयदाते बाळा रखमाजी कोरे यांनी पाटील यांच्याकडून दीड हजार रुपयांत हा वाडा खरेदी केल्याची नोंद आढळते. १९२२ पासून येथे श्री सावतामाळी फ्री बोर्डिग चालविले जात होते. पुढे १९६९ मध्ये त्याचे ‘महात्मा फुले वसतिगृह’ असे नामकरण करण्यात आले. ‘महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुराण वास्तुशास्त्र विषयक स्थळे आणि अवशेष अधिनियम १९६०’नुसार हा वाडा १९७२ मध्ये राज्य संरक्षित स्मारक म्हणून घोषित करण्यात आला. महाराष्ट्र शासनाच्या पुरातत्त्व आणि वास्तु संग्रहालय विभागामार्फत मूळ स्वरूपात जतन करण्यात आले आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव आणि या भागातील माजी नगरसेवक मो. के. कल्याणकर यांनी त्यासाठी प्रयत्न केले. पुढे महात्मा फुले समता परिषदेचे त्याला पाठबळ मिळाले. तत्कालीन उपराष्ट्रपती शंकर दयाळ शर्मा यांच्या हस्ते या स्मारकाचे भूमिपूजन करण्यात आले. या राष्ट्रीय स्मारकाचे उद्घाटन झाले त्या वेळी शंकर दयाळ शर्मा हे राष्ट्रपती होते, अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते नितीन पवार यांनी दिली.
महात्मा फुले यांचे २८ नोव्हेंबर १८९० रोजी याच वाडय़ामध्ये महानिर्वाण झाले. ‘आपल्या शवास दहन करू नये, तर मिठात घालून जमिनीत पुरावे’, अशी अंतिम इच्छा फुले यांनी आपल्या मृत्युपत्रात नमूद करून ठेवली होती. घरामागील बखळीच्या जागेत त्यांनी शेवटच्या आजारपणात खड्डाही खोदून ठेवला होता. परंतु, ब्रिटिश सरकारी अधिकाऱ्याने राहत्या परिसरात दफन करण्यास परवानगी दिली नाही. त्यामुळे नाइलाजाने त्यांच्या पार्थिवाचे दहन करावे लागले. छोटय़ा यशवंताला बरोबर घेऊन सावित्रीबाईंनी अग्नी दिला होता. ३० नोव्हेंबर १८९० रोजी सावित्रीबाईंनी त्यांच्या अस्थी आणून या जागेत ठेवल्या. त्या ठिकाणी सावित्रीबाईंनी उभारलेले वृंदावन आणि बसवलेल्या पादुका हीच महात्मा फुले यांची समाधी. या वृंदावनालाही मेघडंबरी केली जाणार असल्याचे नितीन पवार यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 28, 2015 3:30 am

Web Title: renuation of phule mansion
Next Stories
1 स्वत:च्या दोन महिन्यांच्या मुलाचा ‘तिने’ बहिणीशीच केला सौदा!
2 पिंपरीत काँग्रेसच्या आजी-माजी शहराध्यक्षांच्या वादात प्रदेशाध्यक्षांकडून वरवर मलमपट्टी
3 पोलिसांच्या निष्क्रियतेमुळेच नव्याने उदयास येणाऱ्या ‘भाईं’ची राडेबाजी सुरूच
Just Now!
X