महापालिकेचे अंदाजपत्रक तयार करताना पुणेकरांसाठी आकर्षक घोषणा करायच्या आणि वर्षभरात हे केले जाईल, ते केले जाईल, अशी आश्वासने द्यायची असा प्रकार अनेक वर्षे सुरू आहे. चालू आर्थिक वर्षांच्या अंदाजपत्रकातही अशाच प्रकारच्या अनेक घोषणा करण्यात आल्या होत्या आणि त्यातील फारच थोडय़ा घोषणा अमलात येऊ शकल्या हे वास्तव आहे. त्या बरोबरच यंदाच्याही अंदाजपत्रकात अनेक घोषणा करण्यात आल्या आहेत.
सन २०१५-१६ च्या अंदाजपत्रकात शहरासाठी काही योजनांच्या घोषणा महापालिका प्रशासनाने केल्या होत्या, तर काही घोषणा स्थायी समितीच्या अंदाजपत्रकातून करण्यात आल्या होत्या. वाहतूक सुधारणांसह अनेक बाबींचा समावेश त्यात होता.
घोषणा-
पुणे शहर हे माहिती तंत्रज्ञान उद्योगाचे महत्त्वाचे केंद्र झाल्यामुळे या उद्योगात काम करणाऱ्यांची संख्याही पुण्यात मोठी आहे. एकूणातच आयटी उद्योगाचे महत्त्व लक्षात घेऊन संपूर्ण शहरात वाय-मॅक्स सुविधा कार्यान्वित केली जाईल.
प्रत्यक्षात-
या घोषणेबाबत वर्षभरात काहीही प्रगती झाली नाही. शिवाय वाय-मॅक्स सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली नसतानाच आता पुढील वर्षांत टप्प्याटप्प्याने सर्व शहरात वायफाय सुविधा दिली जाईल अशी घोषणा अंदाजपत्रकात करण्यात आली आहे.
घोषणा-
बाह्य़वळण महामार्गावरील मोठी वाहतूक, पीएमपीचा थांबा, कात्रज गावठाण, दत्तनगर, आंबेगाव या भागाची झालेली वाढ यामुळे कात्रज चौक सतत वाहतूकदृष्टय़ा गजबजलेला झाला आहे. या चौकातील वाहतुकीचे र्सवकष नियोजन करून या चौकात भुयारी मार्ग तसेच उड्डाणपूल बांधला जाईल.
प्रत्यक्षात-
चालू वर्षीच्या अंदाजपत्रकात ही घोषणा करण्यात आली असली आणि या कामासाठी ५० लाखांची तरतूद करण्यात आली असली, तरी प्रत्यक्षात या कामाची सुरुवात करण्याबाबत वर्षभरात प्रशासनाकडून प्रगती झालेली नाही. अखेर स्थानिक नगरसेवक वसंत मोरे यांनी या कामाकडे लक्ष वेधण्यासाठी गेल्या पंधरवडय़ात महापालिकेत आंदोलनही केले.
घोषणा-
महिला बचतगटांसाठी सभागृह बांधले जाईल. तसेच महिला बचत गटांसाठी आधार केंद्र सुरू केले जाईल. महिला सबलीकरण केंद्र, बचतगटांना पुरस्कार दिले जातील.
प्रत्यक्षात-
महिला बचतगटांनी तयार केलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळवून देण्यासाठी कायमस्वरूपी प्रदर्शन तसेच बचतगटांसाठीच्या अनेक योजना जाहीर झाल्या असल्या तरी त्याबाबत प्रगती नाही.
घोषणा-
तीव्र स्वरूपाचे चढ-उतार तसेच नैसर्गिक उंचसखलता यामुळे चांदणी चौक व परिसरातील वाहतूक समस्या जटील बनली आहे. त्यावर उपाय म्हणून या परिसराचा वाहतूक आराखडा तयार करण्यात आला असून त्याला २५० कोटींचा खर्च अपेक्षित आहे. त्यात पहिल्या टप्प्यात चांदणी चौक येथे बहुमजली उड्डाणपूल बांधला जाईल.
प्रत्यक्षात-
चांदणी चौकातील उड्डाणपुलाची चर्चा असली आणि कामासाठी चालू वर्षीच्या अंदाजपत्रकात ४५ लाखांची तरतूद असली तरी हे कामही पुढे सरकलेले नाही.