पुणे : कोंढवा येथील दुर्घटनेप्रकरणी अतिरिक्त जिल्हाधिकारी रमेश काळे यांच्या अध्यक्षतेखाली सहाजणांची चौकशी समिती नेमण्यात आली आहे. या चौकशी समितीने सोमवारी घटनास्थळी भेट दिली. येत्या आठ दिवसात समितीकडून याबाबतचा अहवाल तयार केला जाणार आहे.

कोंढवा येथील संरक्षक भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनाप्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या चौकशी समितीमध्ये कामगार आयुक्त कार्यालयातील प्रतिनिधी, पोलीस आयुक्तांचा प्रतिनिधी, पुणे महानगरपालिकेचे अधिकारी, नगररचना विभागाचे सहायक संचालक आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या प्रतिनिधींचा समावेश आहे. या समितीने सोमवारी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली.

समितीकडून पुणे महानगरपालिका, पोलीस आणि या घटनेशी संबंधित विभागांचे अहवाल मागवण्यात आले आहेत. त्यानंतर सविस्तर अहवाल तयार करण्यात येणार आहे. घटनास्थळी भेट दिल्यानंतर समितीची पहिली बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. या दुर्घटनेप्रकरणी ११ जणांविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला असून दोनजणांना अटक करण्यात आली आहे. तसेच पुणे महापालिकेने विनापरवाना बांधकाम केल्याप्रकरणी बांधकाम व्यावसायिकाला काम थांबवण्याबाबत नोटीस दिली आहे. याशिवाय या प्रकल्पाचे स्थापत्यविषयक योजक, अभियंता आणि वास्तुविशारद यांचे परवाने रद्द करून त्यांना काळ्या यादीत टाकण्यात आले आहे.

‘कोंढवा दुर्घटनेमध्ये मृत्युमुखी पडलेले कामगार बिहारमधील कटिहार जिल्ह्य़ातील आहेत. त्यांचे मृतदेह त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात आले आहेत. मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपये मदत जाहीर करण्यात आली आहे. मृतांचे नातेवाईक किंवा वारसांची नावे तेथील जिल्हाधिकाऱ्यांकडून निश्चित करण्यात येणार आहेत. त्यानंतर संबंधित नातेवाईकांना आर्थिक मदत दिली जाणार आहे’, अशी माहिती निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी दिली.

संबंधित विभागांचे अहवाल मागवले

समितीची बैठक सोमवारी झाली. या बैठकीला महापालिका, पोलीस, नगररचना आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते. या घटनेशी संबंधित विभागांचे अहवाल मागवण्यात आले आहेत. समितीने घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांनी सांगितले.