मुकुंद संगोराम mukund.sangoram@expressindia.com

पुणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांना विनंती की त्यांनी सायंकाळी साडेसहा ते आठ या वेळात जंगली महाराज रस्त्यावरून गरवारे पुलापर्यंत सरकारी वाहनाने प्रवास करावा. तेथून उजवीकडे वळून थेट फग्र्युसन महाविद्यालयापर्यंत यावे. हे करण्यापूर्वी माध्यमांना कल्पना द्यावी. स्वत:चे छायाचित्रकारही मोटारीत ठेवावेत. हे सगळे अंतर कापण्यास त्यांना लागणारा वेळ लिहून ठेवावा आणि तो जाहीरही करावा. पण एवढय़ानेच भागणार नाही. परत याच रस्त्याने त्यांनी पायी प्रवास करावा, अशीही विनंती आहे.

असे केल्याने जंगली महाराज रस्त्यावरील भव्य, दिव्य अशा पदपथांवरून त्यांना चालण्याचा एक अपूर्व अनुभव येईल. या पदपथांवरच लावलेली छोटी आणि मोठी वाहने दिसतील. अनेक हॉटेलांनी त्यांच्या सन्माननीय ग्राहकांना थांबण्यासाठी पदपथावरच टाकलेल्या खुर्च्या दिसतील. पथारीवाले तर किती आनंदात आहेत, हेही त्यांना दिसू शकेल. या रस्त्यावर ठिकठिकाणी असलेल्या बाकांवर बसून हितगूज करणारे तरूण तर पाहायला मिळतीलच, पण त्याबरोबरच अगदी नव्याने केलेल्या पदपथांवर अनेक ठिकाणी टाईल्स कशा हरवल्या आहेत, हेही त्यांना समजू शकेल. हे रस्ते रुंदीकरणाचे डोके कुणाचे आणि त्यासाठी पैशांची किती नासाडी होते आहे, हे त्यांनी समजून घ्यायला हवे.

मोटारीने जाताना अगदी नजरेसमोर छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा दिसत असतानाही, तेथपर्यंत पोहोचण्यास किती वेळ लागतो, हेही त्यांनी घडय़ाळ लावून पाहावे, अशी त्यांना मनापासून विनंती आहे. शक्य असेल तर रस्त्याच्या आजूबाजूलाही नजर फिरवावी. अनेक गणंगांचे वाढदिवस थाटामाटात साजरे करण्यासाठी भव्य अशा होर्डिग्जवरीही लक्ष ठेवावे. त्यांना परवानगी आहे काय, याची दुसऱ्या दिवशी अधिकाऱ्यांकडे चौकशी करावी. हे रस्ते वाहनांसाठी आहेत की चालणाऱ्यांसाठी याचे मनोमन निरीक्षणही करावे. चालणारे किती आणि वाहने किती याची डोळ्यांनीच मोजदाद करावी. सुशोभीकरण सुंदर झाले आहे, याचा अनुभव येण्यास वेळ लागणारच नाही, पण या संपूर्ण रस्त्यावर एकही सार्वजनिक स्वच्छतागृह नाही, हेही त्यांच्या लक्षात येईल, अशी अपेक्षा. जरा मागे जाऊन म्हणजे इन्स्टिटय़ूट ऑफ इंजिनिअरिंगपासून आयुक्त जर चालत आले, तर मॉडर्न प्रशालेजवळ तयार करण्यात आलेला पादचाऱ्यांसाठीच्या भुयारी मार्गाच्या दरवाजांना लावलेली भली मोठी कुलपे पाहायला त्यांनी मुळीच विसरू नये. डेक्कनवर वळण्यापूर्वी पदपथांवर असलेल्या वडापाव, दाबेली यांच्या गाडय़ांवरील अन्न खायलाही हरकत नाही.

फग्र्युसन रस्त्यावरून जाताना आयुक्तांनी जरा जपूनच जायला हवे. त्यांची मोटार गर्दीत अडकली, तर त्यांचा बहुमोल वेळ खूपच वाया जाण्याची शक्यता आहे. पण तरीही त्यांनी हा अनुभव घ्यावाच, अशी त्यांना आग्रहाची विनंती. या रस्त्यावर सध्या पदपथ रूंद करण्याचे काम सुरू आहे. ते शहरातील अन्य ठिकाणी सुरू असलेल्या कामांप्रमाणेच रखडलेले आहे, हे लक्षात येण्यास आयुक्तांना मुळीच वेळ लागणार नाही. हा रस्ता सुंदर होईल, अशी आशा तेथून रोज जाणाऱ्या सर्वाना असते, तशीच ती आयुक्तांनाही असेल.

जरा शहराच्या इतर भागात मोटारीने हिंडताना, काचा खाली करून आणि डोळे उघडे ठेवून पाहिले, तर अनेक ठिकाणी मोठय़ा प्रमाणात कामे सुरू असल्याचे कळायला वेळ लागणार नाही. आपल्या अधिकाऱ्यांच्या कार्यक्षमतेने कदाचित आयुक्तांची कॉलर ताठ होईलही, पण ही सगळी कामे मार्च महिन्यातच का सुरू होतात, या सामान्यांना पडलेल्या प्रश्नाचे उत्तर आयुक्त सहज शोधू शकतील. एकाच रस्त्याचे काम दरवर्षी कसे केले जाते किंवा रस्ता नवा केल्याकेल्या लगेचच तो खणणारी दुसरी यंत्रणा कशी दत्त म्हणून उभी राहते. याचाही शोध आयुक्तांनी घ्यायलाच हवा. नगरसेवक आपल्या अधिकाऱ्यांना कसे गंडवतात आणि आपले अधिकारीही त्याला कसे बळी पडतात, हे आयुक्तांना कुणालाही न विचारता कळू शकेल. रस्ते ही महानगरपालिकेची शहरातील सहज दिसणारी ओळख. तिथेच पालिका माती खाते, हे आयुक्तांनी समजून घ्यायला हवे, अशी आमची अगदी भाबडी अपेक्षा. आमच्या विनंतीला आयुक्तांनी मान द्यावा, अशी अपेक्षा.