दापोडी येथील दुर्दैवी घटनेत अग्निशमन दलाच्या जवानासह नागेश जमादार या कामगाराचा मृत्यू झाला. तर दोघे जण जखमी झाले आहेत. दरम्यान, काम करत असलेल्या नागेशवर मातीचा ढिगारा कोसळला होता. त्यावेळी पहिल्यांदा ईश्वर आणि सीताराम हे तरुण मदतीला धावून आले होते. त्यांनी जीवाची बाजी लावून नागेशला वाचवण्याचे प्रयत्न केले. परंतु, नागेशला मृत्यूने गाठलेच. तब्बल नऊ तासानंतर नागेशचा मृतदेह खड्ड्यातून बाहेर काढण्यात एनडीआरएफच्या जवानांना यश आले.

नागेशला वाचवण्यासाठी प्रयत्न केलेल्या ईश्वर बडगे याच्याशी संवाद साधला. ईश्वर म्हणाला की, “खड्ड्याशेजारी आम्ही उभ होतो. तेव्हा खड्ड्यातून आवाज आला. आम्ही नागेशला वाचवायला गेलो. दोघे जण खड्ड्यात उतरवून बऱ्यापैकी नागेशला वर काढले. नागेशच्या गळ्यापर्यंत माती होती. तो अत्यंत घाबरलेला होता. फावड्याच्या मदतीनं नागेशला कमरेपर्यंत मोकळे करण्यात आले. अर्धा तास नागेशच्या बाजूने माती काढत होतो. तेव्हा अग्निशमन दलाचे तीन कर्मचारी आले. ते देखील खड्ड्यात उतरले. पाच जणांनी मिळून नागेशला गुढघ्यापर्यंत मोकळे करण्यात केले, पण दुर्दैवाने पुन्हा माती ढासळली. जवानांनी लावलेल्या शिडीवरून आम्ही दोघे जण घाबरलेल्या अवस्थेत बाहेर पळत आलो. आम्हाला खूप भीती वाटत होती. ही सर्व घटना अत्यंत वाईट होती. आणखी अर्धा तास बचाव कार्य सुरू ठेवलं असत, तर नागेशवर निघाला असता,” असं ही ईश्वर म्हणाला.

दरम्यान, रविवार रोजी मयत कामगार नागेशला पैश्यांची गरज होती. त्यामुळे नागेशला ठेकेदाराने ५०० रुपये रोजाने कामावर आणले होते. नागेश हा पेटिंग काम करायचा अशी माहिती उपस्थितांनी दिली.