करोना विषाणू संसर्गाचा परिणाम संशोधन संस्थांतील संशोधनावर मोठय़ा प्रमाणात झाला आहे. संशोधक, विद्यार्थी संशोधनासाठी संस्थांमध्ये येऊ शकत नसल्याने अनेक संशोधन प्रकल्प ठप्प झाले आहेत.

विद्यापीठांमध्ये आणि संशोधन संस्थांमध्ये रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र अशा विज्ञानातील विविध शाखांशी संबंधित संशोधन केले जाते. त्यापैकी पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राष्ट्रीय पेशीविज्ञान संस्था, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर), आघारकर संशोधन संस्था अशा राष्ट्रीय स्तरावरील संशोधन संस्थाही आहेत. मात्र, करोना विषाणू संसर्गामुळे उद्भवलेल्या परिस्थितीत या संशोधन संस्थांतील संशोधन कार्यावरही परिणाम झाल्याचे दिसून येत आहेत.

आयसरचे डॉ. संजीव गलांडे म्हणाले, की करोनावरील संशोधन वगळता संस्थेतील अन्य संशोधन ठप्प आहे. विद्यार्थी आपापल्या घरी गेले आहेत. त्यामुळे बहुतेक प्रयोगशाळा बंद आहेत.

पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना काम करण्याची परवानगी मिळण्याबाबत केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि राज्य शासनाला पत्र देण्यात आले आहे. अद्याप त्याला काहीच प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे आता संशोधन प्रकल्प अधिक रखडण्याची शक्यता आहे.

‘करोना संसर्गाचा संशोधनावर परिणाम झाला आहे. टाळेबंदीमुळे काही संशोधक, पीएच.डी.चे विद्यार्थी आपल्या गावी गेले आहेत. त्यामुळे त्यांचे प्रयोगशाळेतील काम होऊ शकत नाही.

तसेच वसतिगृह बंद असल्याने गावी गेलेले संशोधक सद्य:स्थितीत परत येऊ शकत नाही. पुण्यात राहणारे संशोधक संस्थेत येऊ लागल्याने त्यांचे संशोधन सुरू झाले आहे,’ अशी माहिती आघारकर संशोधन संस्थेचे संचालक डॉ. प्रशांत ढाकेफालकर यांनी सांगितले.

काही प्रमाणात ऑनलाइन काम

प्रत्येक संशोधन प्रयोगशाळेतच जाऊन करावे लागते असे नाही. त्यामुळे संशोधनाचे प्रकल्प पुढे नेण्यासाठी ऑनलाइन माध्यमांचा वापर करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यासाठी ऑनलाइन बैठका, चर्चा, माहितीची देवाणघेवाण आदी सुरू आहे. मात्र, प्रयोगशाळेची गरज असलेले संशोधन प्रकल्प जैसे थे आहेत.

आयसरमध्ये विद्यार्थ्यांसाठी  विलगीकरण कक्ष

टाळेबंदीचे नियम आता काही प्रमाणात शिथिल करण्यात येऊ लागले आहेत. त्यामुळे पुढील काही दिवसांत आपल्या घरी गेलेले विद्यार्थी, संशोधक पुन्हा संस्थेत येण्याची शक्यता आहे. मात्र, परत आल्यावर लगेच त्यांना काम सुरू करता येणार नाही. त्यामुळे त्यांना आधी चौदा दिवस विलगीकरणाच्या प्रक्रियेतून जावे लागेल. त्यासाठी आयसरने वसतिगृहात विलगीकरणाची सुविधा निर्माण केली आहे. त्यात निवास आणि भोजनासाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे.

पुण्यात राष्ट्रीय स्तरावरील प्रमुख संशोधन संस्था

* करोनाचा फटका सर्वच क्षेत्रांना बसला आहे. शिक्षणक्षेत्रही त्याला अपवाद नाही. आता संशोधनावरही त्याचा परिणाम झाला आहे. ’विद्यापीठांमध्ये आणि संशोधन संस्थांमध्ये रसायनशास्त्र, जीवशास्त्र, भौतिकशास्त्र अशा विज्ञानातील विविध शाखांशी संबंधित संशोधन केले जाते.

* त्यापैकी पुण्यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह राष्ट्रीय पेशीविज्ञान संस्था, भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर), आघारकर संशोधन संस्था अशा राष्ट्रीय स्तरावरील संशोधन संस्थाही आहेत.