मुंबई : इंदिरा गांधी राष्ट्रीय मुक्त विद्यापीठासह (इग्नू) देशातील पाच विद्यापीठांमध्ये ज्योतिषशास्त्राचे विविध अभ्यासक्रम शिकवले जात असल्याचे समोर आले आहे. विज्ञान प्रसारक चळवळीतील कार्यकर्ते, संशोधक, सामाजिक कार्यकत्र्यांनी हा अभ्यासक्रम बंद करण्याची मागणी केली आहे. मात्र, त्याचवेळी देशातील अनेक नामांकित संशोधनसंस्थांचे प्रमुख, ज्येष्ठ शास्त्रज्ञ याविषयी शांतच आहेत.

इग्नूमध्ये यंदापासून ज्योतिषशास्त्राचा पदव्युत्तर अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. त्याला विविध स्तरातून विरोध करण्यात येत आहे. इग्नूप्रमाणेच देशातील इतरही काही विद्यापीठांमध्ये अशाच स्वरूपाचे अभ्यासक्रम सुरू असल्याचे समोर आले आहे. या अभ्यासक्रमांना विज्ञान प्रसारक, संशोधकांनी विरोध दर्शवला आहे. वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणे आवश्यक असल्याचे नमूद करत हे अभ्यासक्रम बंद करण्याची मागणी कार्यकत्र्यांनी केली आहे. त्यासाठी ऑनलाइन स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली असून देशभरातील आठशेहून अधिक विज्ञान शिक्षक, संशोधक, विद्यार्थी, सामाजिक कार्यकर्ते, विज्ञान प्रसारक यांनी स्वाक्षरी केली आहे.

‘खगोलशास्त्राचा अभ्यासक्रम भारतात वैदिक काळापासून करण्यात येतो. गणितीय मांडणीनुसार सूर्य, चंद्र, ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीचा अभ्यास भारतात होत आला आहे. याबाबतची भारतात करण्यात आलेली सैद्धांतिक मांडणी ही अनेक देशांनी अनुसरली. या अभ्यासाला वैज्ञानिक, तार्किक पार्श्वभूमी आहे. मात्र, सद्य:स्थितीत प्रचलित असलेले ज्योतिषशास्त्र किंवा ग्रहताऱ्यांचा माणसाच्या आयुष्यावर होणारा परिणाम किंवा तत्सम दावे हे छद्माविज्ञान आहे,’ असे मत अभ्यासक्रमांनी निवेदनात नमूद केले आहे.

ज्येष्ठ शास्त्रज्ञ गप्पच… देशभरात अनेक नामांकित संशोधन संस्था आहेत. त्यांच्या प्रमुखपदी ज्येष्ठ शास्त्रज्ञ आहेत. खगोलशास्त्रावर संशोधन करणाऱ्याही अनेक संस्था आहेत. मात्र, या संस्थांच्या प्रमुखांनी या अभ्यासक्रमांबाबत ठोस भूमिका घेतल्याचे दिसत नाही. यापूर्वी विद्यापीठ अनुदान आयोगाने अशाच स्वरूपाचा अभ्यासक्रम सुरू केला होता. त्यावेळी देशातील ज्येष्ठ शास्त्रज्ञांनी त्याला विरोध केला. त्यानंतर हा अभ्यासक्रम रद्द करण्यात आला होता. मात्र, यावेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञांनीही ठोस भूमिका घेतल्याचे दिसत नाही.