News Flash

मराठा समाजातील वंचितांना आरक्षण मिळेल- मुख्यमंत्री

शिवरायांचे प्रमुख पाच किल्ले ‘मॉडेल फोर्ट’ म्हणून विकसित करण्यात येतील. शिवरायांचे लढाईचे नव्हे, तर विकासाचे विचार समजून घ्या.

मराठा समाजाला आरक्षण देण्याबाबत राज्य शासन अनुकूल असून, त्याबाबत शासनाकडून न्यायालयात बाजू मांडण्यात येईल व मराठा समाजातील वंचितांना आरक्षण मिळेल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
शिवजयंती उत्सवानिमित्त शिवनेरीवर आयोजित करण्यात आलेल्या अभिवादन सभेत ते बोलत होते. जिल्ह्य़ाचे पालकमंत्री गिरीश बापट, ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे, गृह राज्यमंत्री राम िशदे, युवराज छत्रपती संभाजीराजे भोसले, शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे, आमदार सुभाष देशमुख, मराठा सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष कामाजी पवार, युवा नेते अतुल बेनके, विघ्नहर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर, शांताराम कुंजीर, राजेंद्र कुंजीर आदी या वेळी उपस्थित होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवजनस्थळात पारंपरिक पद्धतीने पाळणा हालवून शिवजन्माचा सोहळा संपन्न झाला. त्यानंतर राजमाता व बाल शिवबा यांची शिल्पे असलेल्या शिवकुंज स्मारकात मुख्यमंत्री व इतरांनी अभिवादन केले.
फडणवीस म्हणाले, शिवरायांची स्मारके असलेल्या गडकिल्ल्यांच्या संवर्धनासाठी शासनाने समिती स्थापन केली आहे. अरबी समुद्रातील शिवाजी महाराजांच्या जागतिक दर्जाच्या स्मारकाचा प्रकल्प रेंगाळल्याची टीका विरोधक करतात, मात्र विरोधकांना अनेक वर्ष सत्तेत असताना स्मारकाची साधी परवानगी मिळवता आली नाही. आता या स्मारकाच्या परवानगीची कामे मार्गी लागली असून, प्रत्यक्षात दोन महिन्यात भूमिपूजन करू. पुरातत्त्व विभागाशी बोलून दुर्गसंवर्धनाच्या बाबतीतील अडसर दूर करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. शिवरायांचे प्रमुख पाच किल्ले ‘मॉडेल फोर्ट’ म्हणून विकसित करण्यात येतील. शिवरायांचे लढाईचे नव्हे, तर विकासाचे विचार समजून घ्या. वनसंवर्धन, जलसंवर्धनाबाबत राजांचे विचार पथदर्शी होते.
शिवनेरीवर शिवजयंतीला प्रवेशिकांशिवाय प्रवेश दिला जात नाही, अशी शिवप्रेमींची तक्रार असल्याने याबाबत पुढील वर्षांपासून शिवप्रेमींना सुलभतेने गडावर येता येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले.
सकाळी किल्ले शिवनेरीची गडदेवता असलेल्या शिवाई देवीला पूजा अभिषेक विभागीय आयुक्त एस. चोकिलगम, जिल्हाधिकारी सौरभ राव यांच्या हस्ते व प्रांताधिकारी कल्याण पांढरे व तहसीलदार आशा होळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला. त्यानंतर शिवाई देवी मंदिर ते शिवजनस्थळापर्यंत शिवप्रतिमेची पालखीतून मिरवणूक काढण्यात आली.

शिवजन्माच्या सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू असताना काही मंडळींनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत फलक दाखवित निदर्शने करण्याचा प्रयत्न केला. मात्र, नागरिकांनी व पोलिसांनी या मंडळींना खाली बसविले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी शासन सदैव प्रयत्नशील आहे. मात्र, प्रसिद्धीसाठी असे प्रकार करणार असाल, तर ते योग्य नाही. हा शिवजन्माचा सोहळा असून, त्यात असे करणे चांगले नसल्याचे खडे बोल मुख्यमंत्र्यांनी सुनावले व भाषण पुढे सुरू ठेवले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 20, 2016 3:30 am

Web Title: reservation to deprived in maratha samaj
टॅग : Devendra Phadanvis
Next Stories
1 अजितमुळे पिंपरी-चिंचवडचा कायापालट- शरद पवार
2 कोरेगाव पार्क प्रभागातील पाच कचरा प्रक्रिया प्रकल्पांचे उद्घाटन
3 नियमबाह्य़ पदव्या देण्यासाठी खुद्द स्मृती इराणी येणार
Just Now!
X