बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील ‘महाराष्ट्र असोसिएशन ऑफ रेसिडेंट डॉक्टर्स’च्या (मार्ड) निवासी डॉक्टरांनी आपला संप मागे घेतला आहे. तीन दिवस ‘मास बंक’वर (संप) असणारे ३५० निवासी डॉक्टर्स सेवेत पुन्हा रुजू होणार असल्याने काही प्रमाणात तणावग्रस्त असलेल्या ससून सवरेपचार रुग्णालयाच्या सेवा पूर्वीसारख्या सुरळीत होणार आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाने राज्यातील सरकारी आणि महापालिकांच्या रुग्णालयातील निवासी डॉक्टरांना बुधवारी चांगलाच दणका देत संप तत्काळ मागे घेण्याचे आदेश दिले होते. या आदेशानंतरही संप मागे घेतला नाही, तर संपकरी डॉक्टरांवर सरकार आवश्यक ती कारवाई करू शकेल असेही स्पष्ट केले होते. या पाश्र्वभूमीवर गुरुवारी बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयातील निवासी डॉक्टरांनी आपण या संपातून बाहेर पडत असल्याचे पत्र महाविद्यालयाच्या अधिष्ठात्यांना दिले आहे.  
मार्डचे पुण्यातील प्रतिनिधी डॉ. वरुण बी. डी. म्हणाले, ‘‘बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले यांनी गुरुवारी निवासी डॉक्टरांची पुन्हा बैठक घेतली. डॉ. चंदनवाले यांच्या मध्यस्थीमुळे वैद्यकीय शिक्षणमंत्री डॉ. विजयकुमार गावित यांच्याबरोबर सोमवारी झालेल्या बैठकीत देण्यात आलेली आश्वासने येथील निवासी डॉक्टरांना पटली आहेत. आम्ही उच्च न्यायालयाच्या म्हणण्याचा आदर करतो. रुग्णांची अधिक गैरसोय होऊ नये म्हणून पुण्यातील डॉक्टरांनी ‘मास बंक’ मागे घ्यायचा निर्णय घेतला आहे.’’
गुरुवारी संपाच्या तिसऱ्या दिवशीही ससून रुग्णालयाच्या सेवांवर काही प्रमाणात ताण पडतच असल्याचे दिसत होते. विशेष म्हणजे गुरुवारी रुग्णालयात मोठय़ा प्रमाणावर पोलिस बंदोबस्त होता. काही निवासी डॉक्टरांनी रुग्णालयाच्या कामकाजात अडथळा आणण्याचा प्रयत्न केला असून दिवसभरात अशा दोनतीन घटना रुग्णालयात घडल्याचे एका पोलिस कर्मचाऱ्याने सांगितले.
अचानकपणे संपावर गेल्याबद्दल ससूनमधील २२५ निवासी डॉक्टरांना रुग्णालय प्रशासनातर्फे संप मागे घेण्याबाबत नोटिस बजावण्यात आल्या होत्या. रुग्णालयाचे वैद्यकीय अधिष्ठाता डी. जी. कुलकर्णी म्हणाले, ‘‘मार्डचे १९० निवासी डॉक्टर्स गुरुवारी कामावर होते. गुरुवारी संप सुरू असूनही रुग्णालयाचे कामकाज सुरळीत सुरू होते. शस्त्रक्रिया पुढे ढकलल्या गेल्या नाहीत. तसेच ‘प्री व पॅरा’ क्लिनिकल डॉक्टरांनाही कामावर बोलवण्याची वेळ आली नाही.’’