महापालिकेचे दुर्लक्ष; जलपर्णीची समस्या सोडवण्याचे आयुक्तांना साकडे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

तीव्र उन्हाळ्यामुळे अंगाची काहिली होत असतानाच डासांनी घातलेल्या थैमानामुळे सांगवी, नवी सांगवी आणि पिंपळे गुरव परिसरातील नागरिक कमालीचे हैराण झाले आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही महापालिकेचे या समस्येकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांनी आयुक्तांना डास मारणारी बॅट आणि गुडनाईट किट भेट म्हणून देत ही समस्या सोडवण्याचे साकडे सोमवारी घातले.

स्थायी समितीचे माजी अध्यक्ष अतुल शितोळे, माजी नगरसेवक राजेंद्र जगताप यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी आयुक्तांची भेट घेतली. या समस्येची सोडवणूक करण्याची मागणी करणारे निवेदन त्यांनी आयुक्तांना दिले. या वेळी डास मारणारी बॅट, तसेच गुडनाईट किट त्यांना भेट म्हणून देण्यात आले. पालिकेने लक्ष न दिल्याने नद्याचे रूपांतर गटारगंगेत झाले आहे. घाणीमुळे डासांची पैदास वाढली असून नागरिकांना घरात बसणे अशक्य झाले आहे. सायंकाळ होताच डासांचे थवे डोक्यावर येऊ लागतात. अंधार होताच त्यांचे हल्ले सुरू होतात. तीव्र उन्हामुळे आधीच घायकुतीला आलेल्या नागरिकांना डासांचा उपद्रव असह्य़ झाला आहे. सांगवी, नवी सांगवी, पिंपळे गुरव या भागातून वाहणाऱ्या पवना नदीत गेल्या काही महिन्यांपासून मोठय़ा प्रमाणात जलपर्णी साचली आहे, त्याची सफाई वेळेत झालेली नाही.

सांडपाणी नदीत जमा होत असल्याने या समस्येत आणखी भर पडली आहे. नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता निर्माण झाली आहे, अशी परिस्थिती असतानाही पालिकेला त्याचे गांभीर्य नाही.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Residents in sanghvi area badly suffer with mosquito menace
First published on: 03-04-2018 at 02:29 IST