संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. सदानंद मोरे यांनी भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या नियामक मंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. अंतर्गत कलहाने पोखरलेल्या संस्थेच्या पदाधिकाऱ्यांमधील वादाला कंटाळून डॉ. सदानंद मोरे यांनी हे पाऊल उचलले आहे.
डॉ. सदानंद मोरे म्हणाले, गेले काही महिने संस्थेतील पदाधिकारी एकमेकांशी सत्ता स्पर्धा करण्यामध्ये मश्गूल झाले आहेत. काहींनी तर न्यायालयामध्ये धाव घेतली आहे. ज्या संस्थेमध्ये पदाधिकारी एकमताने काम करीत नाहीत असा संस्थेमध्ये माझ्यासारख्याचे काही काम नाही. याच भूमिकेतून मी संस्थेच्या नियामक मंडळ सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे.
संस्थेचे मानद सचिव अरुण बर्वे यांनी डॉ. सदानंद मोरे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. अरुण बर्वे म्हणाले, डॉ. सदानंद मोरे यांचा राजीनामा संस्थेकडे आला आहे. त्यांनी राजीनामा देऊ नये, अशीच सर्वाची इच्छा आहे. पुढील आठवडय़ामध्ये होणाऱ्या संस्थेच्या नियामक मंडळाच्या बैठकीमध्ये या राजीनाम्यावर चर्चा होऊन निर्णय घेण्यात येणार आहे.