भटारखाने गलिच्छ, सडक्या भाज्या, मुदतबाह्य़ मसाले

पावसाळा आणि लोणावळा येथील वर्षांसहली हे पर्यटकांचे आवडते समीकरण आहे. त्यामुळे या हंगामात लाखो पर्यटक लोणावळा येथे आलेले पाहायला मिळतात. मात्र यंदा पावसाळ्यात लोणावळ्याला जाऊन तेथील पर्यटन स्थळांबरोबरच रिसॉर्ट्स आणि हॉटेल्सना भेटी देताना तेथील स्वच्छतेचा गांभीर्याने विचार करावा, अशी परिस्थिती असल्याचे स्पष्ट झाले आहे.

अन्न आणि औषध प्रशासनाच्या अन्न सुरक्षा अधिकाऱ्यांकडून लोणावळ्यात शनिवारी दहा ठिकाणी छापे टाकण्यात आले. या वेळी बहुतांश ठिकाणी मुदतबाह्य़ पदार्थ वापरून तयार केलेल्या खाद्यपदार्थाची विक्री होत असल्याचे आढळून आले. तुंगार्ली परिसरातील लगुना रिसॉर्ट, आबेटेल ग्रँड रिसॉर्ट, ऱ्हिदम हॉटेल, डेला अ‍ॅडव्हेंचर अ‍ॅण्ड रिसॉर्ट, स्टर्लिग हॉलिडे रिसॉर्ट, हॉटेल कैलाश पर्वत, किनारा व्हिलेज, ग्रीन लॅन्ड डेलसोल, कुमार रिसॉर्ट्स अ‍ॅण्ड अ‍ॅम्युजमेंट प्रा. लि. आणि जे. जे. हॉटेल्स अ‍ॅण्ड रिसॉर्ट्स या दहा ठिकाणी ही तपासणी करण्यात आली. सह आयुक्त सुरेश देशमुख यांनी या कारवाईबाबत माहिती दिली.

सह आयुक्त सुरेश देशमुख म्हणाले, मुदतबाह्य़ डाळी, पिठे, ब्रेड, चिकन, फिश फिंगर, मसाले, सडक्या भाज्या, शाकाहारी आणि मांसाहारी पदार्थाची एकाच फ्रीजमध्ये केलेली साठवणूक या गोष्टी तपासणीत आढळून आल्या. सर्वाचे भटरखाने अतिशय गलिच्छ आहेत. स्वच्छतेचे प्राथमिक निकष देखील तेथे पाळले गेलेले नाहीत.

कायद्याने आइस्क्रीमसाठी नायट्रोजनचा वापर करण्यास बंदी आहे. मात्र त्याचा राजरोस वापर लोणावळ्यात होताना दिसतो. अशा प्रकारे नायट्रोजनचा समावेश जिवावर बेतणारा आहे याची जाणीव पर्यटकांनी ठेवणे आवश्यक आहे. पावसाळ्यात लोणावळ्याकडे येणाऱ्या पर्यटकांचा ओघ प्रचंड असतो. खरे तर या रिसॉर्ट आणि हॉटेल्सनी पर्यटकांना दर्जेदार अन्नपदार्थ आणि सेवा देणे अपेक्षित आहे. मात्र तेथील चित्र अजिबात सकारात्मक नाही हे पर्यटकांनी लक्षात ठेवावे.

कारवाईचा प्रस्ताव: तपासणी केलेल्या दहाही हॉटेल्सवर कारवाईचा प्रस्ताव तयार करून दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. या सर्व हॉटेल्स आणि रिसॉर्ट्सना अन्न सुरक्षा आणि मानके कायदा २००६ अंतर्गत सुधारणांची नोटीस पाठवण्यात आली आहे. त्रुटींची पूर्तता न झाल्यास परवाना निलंबनाची कारवाई केली जाईल, असे एफडीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.