किराणा मालापासून कपडय़ांपर्यंत आणि भाजीपाल्यापासून चैनीच्या वस्तूंपर्यंत सर्व गोष्टी आता मॉलमध्ये मिळत असताना ‘आठवडी बाजार’ या ग्रामीण ढंगाच्या संकल्पनेलाही पुणेकर प्रतिसाद देत आहेत, हे वाचून कोणालाही आश्चर्य वाटेल. पण वस्तुस्थिती खरोखरच तशी आहे. शहरी ग्राहक आणि शेतकरी या दोघांच्या फायद्यासाठी पुण्यात भरवल्या जात असलेल्या ‘आठवडी बाजारां’चा प्रतिसाद वाढत आहे आणि लवकरच या बाजारांचा विस्तार शहराच्या वेगवेगळ्या भागांमध्येही होणार आहे.
‘आठवडय़ाचा बाजार’ ही संकल्पना ग्रामीण भागातील. जीवनावश्यक वस्तूंसह शेकडो गोष्टी या बाजारात उपलब्ध असतात. छोटय़ा-मोठय़ा हजारो गावांमध्ये आजही या बाजारांचे महत्त्व टिकून आहे. आठवडी बाजार म्हटले की फक्त खरेदी नसते, तर भेटीगाठी, चर्चा, गप्पा हेही बाजाराचे वैशिष्टय़ असते.
याच संकल्पनेला थोडे आधुनिक रुप देऊन पुणे शहरात आठवडी बाजार सुरू करण्यात आले आहेत. भाजीपाला आणि फळे पिकवणारा शेतकरी त्याचा माल जेव्हा घाऊक बाजारात घेऊन येतो तेव्हा त्याच्या मालाला चांगला दर मिळत नाही आणि हाच भाजीपाला खरेदी करण्यासाठी शहरातील सर्वसामान्य ग्राहक जेव्हा बाजारात जातो तेव्हा त्याला कोणतीच गोष्ट कमी दरात मिळत नाही. ही परिस्थिती ओळखून शेतकरी व ग्राहक या दोघांचाही फायदा व्हावा असे काही तरी करू या, या विचाराने राजेश माने, नरेंद्र पवार, गणेश सवाणे, तुषार अग्रवाल आणि ऋतुराज जाधव या तरुणांना आठवडी बाजार ही कल्पना सुचली. त्यातून ‘श्री स्वामी समर्थ शेतकरी बचतगटा’ची स्थापना त्यांनी केली आणि पुण्याच्या उपनगरांमध्ये आठवडी बाजार सुरू केले.
शेतकरी अतिशय ताजा म्हणजे सकाळी शेतातून तोडलेला भाजीपाला दुपारी या बाजारांमध्ये घेऊन येतात. या बाजारांची वेळ दुपारी तीन ते रात्री आठ अशी आहे. फक्त कोथरूडचा बाजार सकाळी सहा ते दुपारी दोन या वेळेत भरतो. या बाजारांचा मुख्य फायदा म्हणजे शेतकऱ्याचे अनेक खर्च वाचतात आणि ग्राहकाला ताजा, स्वच्छ, निवडलेला भाजीपाला बाजारभावापेक्षा कमी दरात मिळतो. या बाजारात फक्त खरेदी-विक्री होत नाही, तर इथे येणारी मंडळी थोडा वेळ बाजारात रमतात. परस्परांशी गप्पाटप्पा करतात. विरंगुळा म्हणूनही बाजारात अनेक जण येतात, असा अनुभव राजेश माने यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना सांगितला.
महिला बचतगटांनाही या बाजारांमध्ये सहभागी करून घेण्यात आले आहे. त्यांनी तयार केलेली लोणची, मसाले, पापड, कुरडया, मांडे, उकडीचे मोदक आदी अनेक तयार पदार्थ व खाद्यपदार्थ या बाजारांमध्ये उपलब्ध असतात. त्यामुळे आठवडी बाजार हे महिलांसाठीही खास आकर्षण ठरले आहेत. विशेष म्हणजे कल्याणीनगर येथे सुरू होत असलेल्या आठवडी बाजाराच्या या उपक्रमासाठी आता महापालिकाही सहकार्य करणार आहे. पुणे, नगर आणि सातारा जिल्ह्य़ातील सुमारे दीड हजार शेतकऱ्यांना आणि पुण्यातील हजारो ग्राहकांना या बाजारांचा लाभ होत असल्याचीही माहिती माने यांनी दिली. आठवडी बाजार हे अनेकांसाठी पर्यटनस्थळही झाले आहे. ग्राहकांना उत्तम प्रतीचा भाजीपाला कमी दरात माल मिळत असल्यामुळे आणि आठवडी बाजारातील वातावरणामुळे हे फक्त खरेदी-विक्रीचे ठिकाण राहिलेले नाही, तर भेटी-गाठीचे, गप्पांचे, विरंगुळ्याचे आणि बाजाराचे वातावरण अनुभवण्याचेही ठिकाण झाले आहे,असेही माने यांनी सांगितले.

आठवडी बाजाराचे वेळापत्रक

E-communication of 4500 prisoners with their families
साडेचार हजार कैद्यांचा कुटुंबीयांशी ‘ई-संवाद’
Slum Improvement Board, contract,
मुंबई : झोपडपट्टी सुधार मंडळातील ‘कंत्राटा’साठी गोळीबार!
Municipal Corporation ignoring quakes in navi mumbai delayed in making rule for builders
नवी मुंबई : हादऱ्यांच्या मालिकेकडे महापालिकेचा काणाडोळा, बिल्डरांच्या सोयीसाठी नव्या नियमावलीला मुहूर्त सापडेना
Kidnapping for not opening a bank account for stock market trading
मुंबई : शेअर बाजारातील व्यवसायासाठी बँक खाते उघडून न दिल्याने अपहरण

कात्रज डेअरी परिसर- सोमवार
कल्याणीनगर- मंगळवार
वाकड, दत्तमंदिराजवळ- बुधवार
बालेवाडी, दसरा चौक- गुरुवार
बावधन, पाटीलनगर- शुक्रवार
औंध, मुरकुटे शाळेजवळ- शनिवार
कोथरूड, गांधीभवन- रविवार