शहरातील प्रमुख झोपटपट्टय़ा व वस्त्यांमध्ये सकाळपासून सुरू झालेला मतदानाचा उत्साह संध्याकाळपर्यंत कायम राहिला. उन्हाचा तडाखा जाणवत असतानाही बहुतांश मतदान केंद्रांवरील गर्दी कायम होती. झोपडपट्टय़ांमधून सरासरी ६५ टक्क्य़ांपर्यंत मतदान झाले. पालिका निवडणुकीला झोपडपट्टय़ा व वस्त्यांमध्ये असलेला उत्साह यंदा प्रथमच लोकसभेच्या मतदानासाठीही दिसत होता.
सकाळी सात वाजता मतदानाला सुरुवात झाल्यानंतर सुरुवातीला मतदानासाठी गर्दी काहीशी कमी होती. मात्र , सकाळी साडेदहानंतर खऱ्या अर्थाने मतदान केंद्रांमध्ये गर्दी होऊ लागली. येरवडा, खडकी, बोपोडी, पाटील इस्टेट, औंध रस्ता परिसर, पर्वती, जुना बाजार, कामगार पुतळा वसाहत आदी भागामध्ये मतदानाचा उत्साह सर्वाधिक जाणवला. अनेक मतदान केंद्रांवर मतदारांच्या रांगा लागल्याचे चित्र होते. स्वयंस्फूर्तीने गटागटाने मतदान केंद्रांपर्यंत येणारे मतदार, जास्तीत जास्त मतदार घराबाहेर काढून मतदानाला नेणारे कार्यकर्ते, मतदारांची नावे शोधण्यासाठी पक्षांकडून उभा केलेले बूथ व तेथे मतदारांची मोठी गर्दी अशा प्रकारचे उत्साहाचे वातावरण प्रामुख्याने पालिका निवडणुकांमध्ये दिसते. लोकसभेच्या मतदानासाठी मतदार फारसा उत्साह दाखवित नव्हते. मात्र, यंदा हे चित्र पालटलेले दिसले.
भर उन्हात गटागटाने मतदार मतदानासाठी बाहेर पडत असल्याचे चित्र खडकी भागात दिसले. लाल बहाद्दूर शास्त्री शाळेमधील मतदार केंद्रावरील प्रत्येक खोलीत मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. बहुतांश भागामध्ये कधीच मतदानाला बाहेर न पडणारे चेहरे मतदार केंद्रांमध्ये दिसत होते. त्या-त्या भागातील विविध पक्षांचे नगरसेवक मतदान केंद्रांच्या बाहेर तळ ठोकून होते. तरुणांची व प्रामुख्याने तरुणींची संख्याही वस्त्यांमधील मतदान केंद्रामध्ये मोठय़ा प्रमाणावर दिसून येत होती.

पाटील इस्टेटचा नेहमीप्रमाणे ‘ओव्हरटाईम’

पाटील इस्टेट झोपडपट्टीतील मतदारांसाठी यंदाही शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये मतदान केंद्र होते. सकाळपासून या ठिकाणी मतदारांचा ओघ सुरू होता. मात्र, संध्याकाळी पाचनंतर अचानक मोठय़ा प्रमाणावर मतदार मतदान केंद्रामध्ये दाखल होऊ लागले. पाटील इस्टेट भागाची ही सर्वच निवडणुकांची ‘खासियत’ आहे. संध्याकाळी मोठय़ा प्रमाणावर मतदार केंद्रामध्ये आल्याने साडेपाचच्या सुमारास सर्वच खोल्यांसमोर मोठमोठय़ा रांगा लागल्या होत्या. सहा वाजता प्रवेशद्वार बंद करण्यात आले, तरी रांगेत असलेल्या मतदारांचे मतदान करून घेण्यात आले. त्यामुळे संध्याकाळी साडेसातनंतरही मतदान सुरूच असल्याने या केंद्राला नेहमीप्रमाणे ‘ओव्हारटाईम’चा अनुभव मिळाला.