अनेकांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणणाऱ्या, तरीही दुर्लक्षित राहिलेल्या रात्रप्रशालांना विद्यार्थ्यांकडून प्रतिसाद मिळत आहे. राज्यभरात ३६ हजार तर पुण्यात साधारण २ हजार विद्यार्थ्यांनी रात्रप्रशालेचा पर्याय निवडला आहे. दिवसा काम आणि रात्रशाळेत शिक्षण किंवा बाहेरून परीक्षा अशा विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत असल्याचे निरीक्षण रात्रप्रशालेतील शिक्षकांनी नोंदवले आहे.
काम करून घराला हातभार लावताना शिकण्याचीही इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हक्काचा पर्याय म्हणजे रात्रप्रशाला. अनेक आव्हानांना तोंड देऊन रात्रप्रशालेतील विद्यार्थी शिक्षण घेत असतात, तेही नियमित शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्यांप्रमाणेच. राज्यात १८५५ साली पहिली रात्रप्रशाला सुरू झाली. त्यानंतर पुण्यात १९२० साली पूना नाईट स्कूल सुरू झाले. राज्यभरात सध्या १८६ रात्रप्रशाला आहेत. त्यापैकी ५६ उच्चमाध्यमिक प्रशाला आहेत तर वरिष्ठ महाविद्यालये ८ आहेत. राज्यातील एकूण रात्रप्रशालांची आकडेवारी मोठी दिसत असली तरीही त्या राज्यभरात विखुरलेल्या मात्र नाहीत. राज्यातील सर्वाधिक म्हणजे १४१ रात्रप्रशाला या मुंबईत आहेत. पुण्यात ४ रात्रप्रशाला आहेत. पुण्यात साधारण दोन हजार विद्यार्थी रात्रप्रशालांमध्ये शिक्षण घेत आहेत. बदलत्या परिस्थितीत कमावणे आणि शिक्षण अशा दोन्ही गोष्टी करण्याची वेळ अनेक विद्यार्थ्यांवर येते. त्यामुळे गेली काही वर्षे रात्रप्रशालेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या वाढताना दिसत आहे, अशी माहिती रात्रप्रशालेतील शिक्षक अविनाश ताकवले यांनी दिली.
अडचणीत असलेल्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देणाऱ्या रात्रप्रशालांसमोर मात्र अनेक अडचणी आहेत. रात्रप्रशालेतील शिक्षक आणि कर्मचारी हे अर्धवेळ काम करणारे असतात. त्यामुळे भत्ते, भविष्य निर्वाह निधी, सेवानिवृत्ती वेतन असा सुविधा त्यांना मिळत नाहीत. या शाळांना अनुदान मिळत नाही. त्याचप्रमाणे विद्यार्थी हे आर्थिकदृष्टय़ा सक्षम नसल्यामुळे इतर खासगी शाळांप्रमाणे त्यांच्याकडूनही शुल्क आकारता येत नाही. प्रयोगशाळा, ग्रंथालय, सुरक्षा अशा सुविधा मिळण्यातही अनेक शाळांना अडचणी येतात.
रात्रप्रशाला अधिवेशन
रात्रप्रशालांच्या अधिवेशनाचे गुरुवारी उद्घाटन झाले असून शुक्रवारी (२५ डिसेंबर)  अधिवेशनाचा दुसरा दिवस आहे. रात्रशाळांना मोफत वीज सवलत मिळावी, प्रत्येक तालुक्यात रात्रशाळा सुरू करण्यात यावी, शिक्षक आणि कर्मचाऱ्यांना दिवसाच्या नियमित शाळेतील कर्मचाऱ्यांप्रमाणे भत्ते आणि वेतन मिळावे, सेवकांची संख्या निश्चित करण्यासाठी दिवसाच्या शाळांप्रमाणे पटसंख्येचे नियम लागू करण्यात येऊ नयेत, अशा रात्रप्रशालांच्या मागण्यांबरोबरच इतर मुद्दय़ांवर या अधिवेशनांत चर्चा करण्यात येणार आहे, असे अधिवेशनाचे अध्यक्ष संजय सातपुते यांनी सांगितले.