01 October 2020

News Flash

ऑनलाइन संस्कृत संभाषण वर्गाला प्रतिसाद

विविध वयोगटांतील बाराशेहून अधिक जणांची नोंदणी

संग्रहित छायाचित्र

ज्ञानभाषा समजल्या जाणाऱ्या संस्कृतच्या मोफत ऑनलाइन संभाषण वर्गाला उदंड प्रतिसाद लाभत आहे. विविध वयोगटांतील बाराशेहून अधिक जणांनी नोंदणी करून संस्कृत संभाषण शिकण्याची इच्छा प्रदर्शित केली आहे.

करोना आपत्तीच्या निमित्ताने सगळे व्यवहार थंडावले असताना मिळालेल्या सुटीचा लाभ घेत संस्कृत भाषा शिकणाऱ्यांची संख्या वाढताना दिसत आहे. संस्कृत भारती संस्थेतर्फे संस्कृत संभाषण शिकू इच्छिणाऱ्या व्यक्तींसाठी मोफत शिबिरांचे आयोजन केले जाते.  टाळेबंदीमुळे यंदा ऑनलाइन संभाषण वर्गाचे आयोजन करण्यात आले आहे. संस्कृत सप्ताहानिमित्त अशा प्रकारचे २१ वर्ग घेण्यात येत असून त्यासाठी तब्बल १२६० जणांनी नोंदणी केली आहे.

ऑनलाइन माध्यमातून इतक्या मोठय़ा संख्येने संस्कृत संभाषण वर्गाना प्रतिसाद मिळण्याची ही पहिलीची घटना असल्याचे संस्कृत भारतीचे प्रांत सहमंत्री विनय दुनाखे यांनी सांगितले. सकाळ, दुपार आणि सायंकाळ अशा पद्धतीने आयोजित या वर्गासाठी शंभर टक्के नोंदणी झाली आहे. संस्थेसाठी सेवाभावी वृत्तीने काम करणारे ३० कार्यकर्ते या वर्गामध्ये शिक्षकाची भूमिका बजावत आहेत. केवळ मराठीच नाही तर हिंदी आणि कन्नड मातृभाषा असणाऱ्या व्यक्ती या वर्गामध्ये मोठय़ा संख्येने सहभागी झाल्या आहेत. दहा दिवसांच्या या वर्गामध्ये दैनंदिन व्यवहारातील संस्कृत वाक्ये शिकवण्यात येतात. हा वर्ग पूर्ण केल्यानंतर व्यक्तीला संस्कृतमधून संवाद करण्याची साधारण कौशल्ये आत्मसात होतात, असे दुनाखे यांनी सांगितले.

धार्मिक कार्याची भाषा या गैरसमजाला छेद

संस्कृत ही ज्ञानभाषा असल्यामुळे प्रत्येक भारतीयाच्या मनामध्ये ही भाषा शिकण्याची इच्छा आहे; परंतु ती कोठे आणि कशी शिकायची, हे अनेकांना माहीत नसते. आता घरबसल्या संस्कृत शिकण्याची सोय झाल्यामुळे प्रतिसाद वाढला आहे. संस्कृत ही केवळ धार्मिक कार्याची भाषा आहे, या समाजामध्ये असलेल्या गैरसमजाला ऑनलाइन संस्कृत संभाषण वर्गाला मिळालेल्या प्रतिसादाने छेद दिला आहे, असे विनय दुनाखे यांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 4, 2020 12:04 am

Web Title: response to online sanskrit conversation class abn 97
Next Stories
1 मंदिरे बंद असल्याने तीर्थक्षेत्रांची अर्थव्यवस्था कोलमडली
2 पिंपरी-चिंचवडमध्ये दिवसभरात २० जणांचा मत्यू, ७४८ नवे करोनाबाधित
3 पुण्यात दिवसभरात १८ रुग्णाचा मृत्यू, ७८१ नवे करोनाबाधित
Just Now!
X