‘राजकीय इच्छाशक्तीच्या अभावामुळे पर्यावरणाचे रक्षण होत नाही. त्यामुळे बदलत्या वातावरणाला अनुरूप असे पर्यावरण संरक्षणाचे धोरण ठरवून त्याची जबाबदारी राजकारण्यांवर टाकावी,’ असे मत काऊन्सिल फॉर सायन्स अँड इन्डस्ट्रियल रिसर्चचे (सीएसआयआर) पर्यावरण विभागाचे माजी संचालक जी. त्यागराजन यांनी गुरूवारी व्यक्त केले.
पुणे विद्यापीठाच्या ‘स्कूल ऑफ एनर्जी स्टडिज’ आणि पर्यावरणशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या राष्ट्रीय ऊर्जा आणि पर्यावरण परिषदेच्या उद्घाटन सोहळ्यामध्ये त्यागराजन बोलत होते. या वेळी अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. अनिल काकोडकर, पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासूदेव गाडे, डॉ. नितीन करमळकर, डॉ. एस. व्ही. घैसास, आदी या वेळी उपस्थित होते.
या वेळी त्यागराजन म्हणाले, ‘‘आकाश, पाणी, हवा सर्वच पातळीवर प्रदूषण आहे. विकासासाठी ऊर्जेच्या नव्या स्रोतांचा शोध घेतला जात आहे. मात्र, त्यामुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा शोध घेणे गरजेचे आहे आणि त्याचबरोबर पर्यावरण संवर्धनासाठी इच्छाशक्तीचीही गरज आहे. बदलणाऱ्या पर्यावरणानुसार त्याच्या संवर्धनाचे धोरण बदलणेही गरजेचे आहे. प्रत्येक भागातील पर्यावरण संवर्धनाची जबाबदारी त्या भागातील स्थानिक राजकारण्यांनी उचलली पाहिजे. किंबहुना त्यासाठी नियम करून पर्यावरण रक्षणाची जबाबदारी राजकारण्यांवर सोपवावी.’’
या वेळी डॉ. काकोडकर म्हणाले, ‘‘ऊर्जेच्या नव्या पर्यायांचा विचार करणे ही काळाची गरज आहे. ऊर्जेचे नवे स्रोत शोधून काढण्यासाठी नव्या तंत्रज्ञानाचा वापर होणे गरजेचे आहे. भारतातील परिस्थितीचा, जीवनशैलीचा आढावा घेऊन ऊर्जेच्या नव्या पर्यायांचा विचार व्हायला हवा. भारतात अन्न शिजवण्यासाठी आणि विजेसाठी सर्वाधिक ऊर्जा वापरली जाते. या दोन गोष्टींसाठी कोणते पर्याय उपलब्ध होऊ शकतील याचा विचार करणे गरजेचे आहे.’’