पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाची अतिरिक्त जबाबदारी सन्माननीय प्राध्यापक (प्रोफे सर ऑफ एमिरेट्स) डॉ. अरविंद शाळिग्राम यांच्यावर देण्यात आली आहे. परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे टाळेबंदीमुळे कोल्हापूर येथे अडकल्याने विद्यापीठाने हा निर्णय घेतला आहे.

विद्यापीठाने परिपत्रकाद्वारे हा निर्णय जाहीर के ला आहे. टाळेबंदीमुळे विद्यापीठांच्या परीक्षा रखडल्या आहेत. विद्यापीठ अनुदान आयोग आणि राज्य शासनाच्या निर्देशांनुसार विद्यापीठाच्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षांच्या विद्यार्थ्यांना परीक्षा न घेता वर्गोन्नती दिली जाणार आहे. तर तृतीय वर्षांच्या विद्यार्थ्यांची परीक्षा टाळेबंदीनंतर घेतली जाणार आहे. त्यामुळे विद्यापीठांमध्ये परीक्षांबाबतची तयारी करण्यात येत आहे.

डॉ. काकडे यांची काही महिन्यांपूर्वीच विद्यापीठाच्या परीक्षा आणि मूल्यमापन मंडळाच्या संचालक पदी निवड झाली होती. मूळचे कोल्हापूरचे असलेले डॉ. काकडे टाळेबंदीमुळे कोल्हापूर येथे अडकले आहेत. तर डॉ. शाळिग्राम निवृत्तीनंतर विद्यापीठाच्या इलेक्ट्रॉनिक सायन्स विभागात सन्माननीय प्राध्यापक म्हणून कार्यरत आहेत. डॉ. काकडे यांना दूरध्वनी आणि लघुसंदेशाद्वारे संपर्क  साधण्याचा प्रयत्न करूनही संपर्क  होऊ शकला नाही.

करोना विषाणू संसर्गाचा काळ हा अभूतपूर्व आहे. या कालावधीत विद्यार्थिकेद्रित निर्णय आवश्यक आहेत. डॉ. काकडे यांच्या अनुपस्थितीत अनुभवी आणि जबाबदार व्यक्तीकडे परीक्षा विभागाची जबाबदारी देण्याची गरज होती. त्यामुळे डॉ. शाळिग्राम यांच्याकडे ही जबाबदारी देण्यात आली. या पूर्वी त्यांनी प्रभावी कु लसचिव आणि परीक्षा विभागाचे संचालक या दोन्ही जबाबदाऱ्या निभावल्या आहेत. ही नियुक्ती करताना कायदेशीर सल्लाही घेण्यात आला आहे.

– डॉ. नितीन करमळकर, कु लगुरू, सावित्रीबाई फु ले पुणे विद्यापीठ

कोल्हापूरच्या जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी घेऊन डॉ. काकडे विद्यापीठात येऊ शकतात. परीक्षा आणि मूल्यमापन मंडळ संचालक हे सांविधानिक पद असल्याने ते विद्यापीठातील सेवेत असलेल्या अधिकाऱ्याकडे दिले पाहिजे.

– डॉ. धनराज माने, संचालक, उच्च शिक्षण संचालनालय