पुणे : शिक्षणमंत्री आशिष शेलार यांनी शिक्षक भरतीचा दुसरा टप्पाही विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी पूर्ण होणार असल्याचे सांगितले होते. मात्र, आता कोणत्याही क्षणी आचारसंहिता जाहीर होणार असल्याने उर्वरित शिक्षक भरती प्रक्रिया निवडणुकीनंतरच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आता नोव्हेंबरमध्ये शिक्षक भरती प्रक्रिया होणार आहे.

शिक्षण विभागाकडून पवित्र संकेतस्थळाद्वारे १२ हजारांहून अधिक शिक्षकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया राबवण्यात येत आहे. त्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमध्ये मुलाखतीशिवाय ५ हजार ५१ उमेदवारांची निवड करून त्यांना नियुक्तीपत्रे देण्यात आली. मात्र, आता उर्वरित जागांवरील भरती प्रक्रियेचे काय, असा प्रश्न स्थानिक स्वराज्य संस्था आणि खासगी शिक्षण संस्थांतील शिक्षक भरतीसाठीच्या इच्छुक उमेदवारांकडून विचारण्यात येत आहे.

सुमारे ७ हजार उमेदवारांनी निवड यादीत संधी न मिळाल्यामुळे दाखल केलेल्या तक्रार अर्जाची तपासणी करण्यात येत आहे. नियमांची पूर्तता करणाऱ्या अर्जाचा विचार करून त्या उमेदवारांना संधी देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. समांतर आरक्षणात पात्र असलेल्या उमेदवारांचीही तपासणी सुरू आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांमध्ये नियुक्त उमेदवारांच्या माध्यमाबाबत निर्माण झालेल्या अडचणी सोडवण्यात येत आहेत.

संकेतस्थळाच्या तांत्रिक अडचणी दूर करून त्यात बदल करावे लागणार असल्याने त्यात वेळ जाणार आहे. त्यामुळे मुलाखतीशिवायच्या भरती प्रक्रियेचे सर्व कामकाज झाल्यानंतरच खासगी शाळांमधील शिक्षक भरती करण्याचे नियोजन करण्यात येईल. त्यासाठी नोव्हेंबर किंवा डिसेंबर उजाडण्याची शक्यता आहे. मात्र, वर्ष संपण्यापूर्वी शिक्षक भरती पूर्ण होईल, असे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी यांनी सांगितले.