कसबा पेठेतील श्री सिद्धिविनायक गुंडाचा गणपती या पेशवेकालीन मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम हाती घेण्यात आले आहे. या ऐतिहासिक महत्त्व असलेल्या मंदिराच्या मूळ रचनेला कोठेही धक्का न लावता जीर्णोद्धाराचे काम होणार असून प्रसिद्ध वास्तुविशारद अंजली आणि किरण कलमदानी यांच्या ‘किमया’ या संस्थेच्या माध्यमातून हे काम हाती घेण्यात आले आहे.
पेशवेकालीन कागदपत्रांमध्ये या गणपतीचा उल्लेख आहे. लोकमान्य टिळकांचे गुरू अण्णासाहेब पटवर्धन यांचा जन्म या गणपतीच्या आशीर्वादाने झाला असे सांगितले जाते. ही उजव्या सोंडेची श्रींची मूर्ती असून हे मंदिर जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते. या देवस्थानची वहिवाट सन १८५२ ते १९१० पर्यंत चित्राव घराण्याकडे होती. मंदिरातील मूर्ती शिलाहार कालानंतरची पण शिवकालाच्या आधीची असावी, असा अंदाज आहे.
सध्या या मंदिराची देखभाल चंद्रशेखर मधुकर बाभळे, भालचंद्र यशवंत बाभळे, दीपक प्रभाकर बाभळे यांच्याकडे आहे. गणपतीच्या मूर्तीवरील कवच सन १९७५ साली निघाले. त्या वेळी या मूर्तीची पाहणी भारत इतिहास संशोधन मंडळ आणि डेक्कन पुरातत्त्व महाविद्यालयातील तज्ज्ञांनी केली होती. तेव्हा ही मूर्ती चौदाव्या शतकातील असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला होता. त्यामुळे नवीन मूर्तीची स्थापना करण्यासाठी काका वडके यांच्या अध्यक्षतेखाली मंडळाची स्थापना करण्यात आली होती.
श्री गणेश मूर्तीवरील थर काढून ४ फेब्रुवारी १९७६ रोजी नवीन मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्यानंतर मूर्तीचा साचा केळकर संग्रहालयाला भेट देण्यात आला, अशी माहिती विश्वस्त चंद्रशेखर बाभळे यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. ते म्हणाले,‘‘मंदिरात नित्यनियमाने येणाऱ्या भाविकांनी वेळोवेळी सुधारणेच्या कामांना हातभार लावला आहे. त्यात प्रामुख्याने अष्टेकर, जोगदेव, करमरकर या कुटुंबांचा उल्लेख करावासा वाटतो. पौष मासात गणेश पुराण व माघ महिन्यात गणेश जन्मानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन मंदिरात करण्यात येते. मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी येणारा खर्च भाविकांच्या देणगीतून करण्यात येणार आहे.’’

कसबा पेठेतील श्री गुंडाचा गणपती हे मंदिर उत्तर पेशवाईच्या काळात बांधले गेले असावे. मंदिराच्या मूळ रचनेला कोठेही धक्का न पोहोचविता जीर्णोद्धार करण्यात येणार आहे. लाकडी छत, कळस, सभामंडप यांची डागडुजी करण्यात येणार आहे. बाभळे हे चतु:शृंगी येथील पार्वतीनंदन गणपती मंदिराचे विश्वस्त आहेत. या मंदिराचा जीर्णोद्धार ‘किमया’ने केला होता. त्याची दखल युनेस्कोने घेतली आहे. सांस्कृतिक वारसा जतन आणि संवर्धन करण्यासाठी दिला जाणारा युनेस्को एशिया पॅसेफिक हेरिटेज अॅवॉर्डही त्या कामासाठी मिळाला आहे.
किरण कलमदानी, वास्तुविशारद

Ram Divya ABhishek
Ram Navami : प्रभू रामाच्या मूर्तीवर दुग्धाभिषेक! अयोध्येतल्या मंदिरातील रामलल्लाचं मूळ रुप दर्शन
Ram Navami 2024 Sury Tilak Festival
Ram Navami: अयोध्येत प्रभू रामाच्या मूर्तीचा सूर्यतिलक! डोळ्यांचं पारणं फेडणारा सोहळा पाहण्यासाठी भाविकांची गर्दी
actress raveena tondon marathi news
‘आर्ची’च्या मनमोहक अदांमुळे रविना टंडनही घायाळ! अनेक सेलिब्रिटींना…
Ambabai Devis darshan will be restored from Tuesday conservation process of the idol is complete
अंबाबाईचे मंगळवारपासून दर्शन होणार पूर्ववत; मूर्तीची संवर्धन प्रक्रिया पूर्ण