करोनाच्या संसर्गाला अटकाव घालण्यासाठी प्रशासन तसेच पोलिसांनी करोनाबाधित भागात लागू केलेले निर्बंध येत्या रविवापर्यंत (३ मे) कायम राहणार आहेत. या भागात फक्त दूध सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत उपलब्ध होणार असून भाजीपाला, किराणा तसेच जीवनावश्यक वस्तूंची दुकाने बंद ठेवण्यात येणार आहेत.

करोनाबाधित भागातील रुग्णांची संख्या तसेच संसर्गाचे वाढते प्रमाण पाहता यापूर्वी लागू करण्यात आलेले कडक निर्बंध ३ मेपर्यंत कायम राहणार आहेत, अशी माहिती सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी दिली.

संचारबंदी, वाहतूकबंदीची अंमलबजावणी क डक करण्यात येणार आहे. करोनाबाधित भागातील दूधविक्री केंद्रे सकाळी १० ते दुपारी १२ यावेळेत खुली राहणार आहेत. घरपोच दूध वितरण सेवा देणाऱ्यांसाठी सकाळी १० ते सायंकाळी ६ अशी वेळ निश्चित करण्यात आली आहे. दुधाच्या वाहतुकीवर कोणतेही निर्बंध घालण्यात आले नाहीत. नागरिकांनी प्रशासन तसेच पोलिसांना सहकार्य करावे. पोलिसांच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन डॉ. शिसवे यांनी केले आहे.

पुढील भागात निर्बंध

कडक निर्बंध घालण्यात आलेला शहरातील भाग पुढीलप्रमाणे- समर्थ, खडक, फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पेठा (कसबा पेठ, मंगळवार  पेठ, सोमवार पेठ , रास्ता पेठ, नाना पेठ ,भवानी पेठ, घोरपडे पेठ, खडकी पोलीस ठाण्यातील पाटील इस्टेट, इराणी वस्ती परिसर), स्वारगेट पोलीस ठाण्यातील गुलटेकडी, महर्षीनगर, डायस प्लॉट,  इंदिरानगर, खड्डा झोपडपट्टी, लष्कर पोलीस ठाण्यातील नवीन मोदीखाना, पूना कॉलेज रस्ता, मोदीखाना, भीमपुरा, बाबाजान दर्गा, छत्रपती शिवाजी मार्केट, बंडगार्डन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताडीवाला रस्ता भाग, सहकारनगर पोलीस ठाण्यातील तळजाई वसाहत, बालाजीनगर भाग, दत्तवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पर्वती दर्शन परिसर, येरवडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील लक्ष्मीनगर, गाडीतळ परिसर.

नागरिकांना अडचण आल्यास संपर्क साधा

करोनाबाधित भागात कडक निर्बंध घालण्यात आले असून नागरिकांना या काळात काही समस्या तसेच अडचण आल्यास त्वरित पोलीस नियंत्रण कक्षाशी (दूरध्वनी क्रमांक-१००) संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.