पुणे : करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील शैक्षणिक विभाग ३० एप्रिलपर्यंत बंद राहणार आहेत. या कालावधीत प्राध्यापक आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबत निर्बंध लागू करण्यात आले असून, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांनी घरातून काम करण्याच्या सूचना कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. तसेच केवळ अधिकारी, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यापीठातील रहिवाशांना ओळखपत्र तपासून विद्यापीठात प्रवेश दिला जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्य शासनाकडून वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी निर्बंधांमध्ये वाढ करण्यात आली आहे. त्यासाठीच्या मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर डॉ. पवार यांनी प्रसिद्ध के लेल्या परिपत्रकानुसार विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्थांनी त्यांच्या आवश्यकतेप्रमाणे कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यापीठातील महत्त्वाची प्रशासकीय कामे सुरू राहण्यासाठी विभागप्रमुखांनी ५० टक्के  कर्मचाऱ्यांना आळीपाळीने कामावर उपस्थित राहण्याच्या सूचना द्याव्यात. कार्यालयात उपस्थित राहण्याबाबत सूट मिळालेल्या कर्मचाऱ्यांनी घरातून काम करायचे आहे.

या कालावधीत अत्यावश्यक कार्यालयीन कामकाजासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांनी शिक्षक किंवा अधिकाऱ्यांना उपस्थित राहण्याचे आदेश दिल्यास त्यांनी त्वरित उपस्थित राहायचे आहे. प्राध्यापक आणि कर्मचारी यांनी पूर्व परवानगीशिवाय मुख्यालय सोडू नये, असेही सांगण्यात आले आहे. त्याचप्रमाणे प्रतिबंधित क्षेत्रातील प्राध्यापक-कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्याची मुभा दिली आहे.

परीक्षेचे काम अत्यावश्यक

विद्यापीठाच्या सत्र परीक्षा ऑनलाइन पद्धतीने सुरू आहेत. परीक्षा आणि परीक्षेच्या संबंधित कामकाज अत्यावश्यक स्वरूपाचे असल्याने परीक्षा व मूल्यमापन मंडळातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार मंडळाचे संचालक डॉ. महेश काकडे यांना राहतील, असेही डॉ. पवार यांनी स्पष्ट के ले आहे.