‘बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम सुरळीतपणे झाले असून मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात बारावीचा निकाल जाहीर केला जाईल,’ असे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाचे अध्यक्ष सर्जेराव जाधव यांनी शनिवारी माध्यमांशी बोलताना सांगितले.
बारावीच्या उत्तरपत्रिकांच्या तपासणीवर कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षकांनी बहिष्कार टाकला होता. त्यामुळे नियोजित वेळापत्रकानुसार उत्तरपत्रिकांची तपासणी सुरू झाली नव्हती. उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम लांबल्यामुळे या वर्षी बारावीचा निकाल वेळेवर लागणार का? अशी चर्चा सुरू झाली होती. त्याबाबत जाधव म्हणाले, ‘‘शिक्षकांनी बहिष्कार मागे घेतल्यानंतर उत्तरपत्रिकांच्या तपासणीचे काम सुरळीतपणे सुरू झाले आहे. सध्याच्या कामाच्या स्थितीचा विचार करता मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ामध्ये बारावीचा निकाल जाहीर करण्यात येईल.’’
गेले काही वर्षे २० ते २५ मेच्या दरम्यान बारावीचा निकाल जाहीर केला जात आहे. या वर्षी उत्तरपत्रिकांची उशिरा सुरू झालेली तपासणी आणि पाच जूनच्या आधी निकाल जाहीर करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची टांगती तलवार या पाश्र्वभूमीवर दर वर्षीप्रमाणेच मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात निकाल जाहीर करण्यासाठी राज्यमंडळातील कर्मचाऱ्यांकडून दिवस रात्र काम केले जात आहे. मात्र, पुनर्मूल्यांकनाचे निकालही ५ जूनपूर्वी जाहीर करण्याचे सर्वोच्च न्यायालयाने दिलेले आदेश पाळणे शक्य होणार नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.